यंदा शाळांच्या सहली ‘पुस्तकाच्या गावी’
By Admin | Published: June 6, 2017 05:56 AM2017-06-06T05:56:07+5:302017-06-06T05:56:07+5:30
शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंटरनेटच्या काळात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शालेय स्तरापासून मुलांच्या हाती टॅब, स्मार्ट फोन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणार कशी, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षात यावर तोडगा काढला जाणार आहे. ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून सरकारने जाहीर केलेल्या भिलारमध्ये शालेय सहली नेण्यासाठी मुख्याध्यापक संघटना पुढाकार घेणार आहेत.
काहीच दिवसांपूर्वी शालेय सहलींसाठी ऐतिहासिक स्थळांची, ज्ञान मिळेल अशा स्थळांची निवड करण्यात यावी, असा जीआर शासनाने काढला होता. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहली कुठे जाणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आता त्यात भिलार गावाचे नाव पुढे आहे. गेल्या काही वर्षांत शालेय सहलींच्या स्वरूपात बदल झाला होता.
वॉटर पार्क, रिसॉर्ट अशा ठिकाणी सहली नेण्याचा शाळांचा कल असायचा, पण मजा-मस्ती सोडल्यास विद्यार्थ्यांना या सहलीतून काहीही शिकायला मिळत नव्हते. त्यामुळे शासनातर्फे हा जीआर काढण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाने निसर्ग आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा जपणाऱ्या महाबळेश्वरजवळील भिलार गावाची निवड ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून केली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणून भिलार गावी सहली नेण्याचा विचार मुख्याध्यापकांनी मांडला आहे. पुुस्तकांच्या गावात कथा, कादंबरी, ललित लेखन, क्रीडाविषयक ज्ञान, विज्ञान, वैचारिक आणि अन्य अनेक ग्रंथ व पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, वाचकांची तिथे वाचनासह राहण्याची सोय करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन, वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षक, शिक्षक परिषदेच्या वतीने पुढाकार घेऊन, शाळांच्या सहली भिलार येथे काढण्यासाठी शाळांमध्ये जागृती करणार असल्याचे परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
पुस्तकांच्या गावाला ६ जून रोजी शिक्षक भेट देणार आहेत. मुंबईतल्या शाळांतले काही शिक्षक या भेटीत सहभागी होणार आहेत.
>महाराष्ट्र मराठी माध्यमिक अध्यापक संघाने पुस्तकाचे गाव याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी ‘पुस्तकाच्या गावा’वर विशेषांकही काढला आहे. लवकरच या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.