महापौरांसाठी सव्वा वर्ष

By Admin | Published: March 4, 2017 01:13 AM2017-03-04T01:13:48+5:302017-03-04T01:13:48+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक १४ मार्चला होणार आहे.

The Year of the Mayor | महापौरांसाठी सव्वा वर्ष

महापौरांसाठी सव्वा वर्ष

googlenewsNext


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक १४ मार्चला होणार आहे. त्यामुळे महापौर, उमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार? याबाबत उत्सुकता आहे. अधिकाधिक सदस्यांना महापौर होता यावे, यासाठी भारतीय जनता पक्षाने सव्वा वर्ष हा फार्म्युला अवलंबिला आहे. त्यामुळे आता चार महापौर, चार उपमहापौर आणि चार स्थायी समिती अध्यक्ष होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता होती. त्या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ठरवतील त्याच व्यक्तीला पद मिळत होते. तसेच गटातटांचाही समतोल सांभाळण्याचे काम केले जात होते. मात्र, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळालेले आहे. या वेळी महापौरपदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण असून, महापौर, उपमहापौरपदी वर्णी लागावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, आशा शेंडगे, जयश्री गावडे, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे, संतोष लोंढे, राहुल जाधव, योगिता नागरगोजे, खासदार अमर साबळे यांचे समर्थक केशव घोळवे यांची नावे चर्चेत आहेत.
शहरात जगताप, लांडगे, साबळे आणि आझम पानसरे असे गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे महापौर पिंपरी, चिंचवड की भोसरी विधानसभेचा होणार, कोणत्या गटाच्या उमेदवारास संधी मिळणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपातील स्थानिक नेत्यांचे एकजूट झाली. मात्र, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती निवडीत कोणाच्या समर्थकांस स्थान द्यायचे, कोणाचा पहिला क्रमांक याबाबत चर्चा सुरू आहे. पाच वर्षांत एकच महापौर न देता सव्वा वर्ष प्रत्येकास दिल्यास शहरात चार महापौर होऊ शकतात. त्यामुळेच हाच फार्म्युला अवलंबिला जाणार असल्याचे भाजपातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>कार्यकर्त्यांची मागणी : जुन्यांचा विचार व्हावा
निवडणुकीपूर्वीच पक्षात आलेल्या उमेदवारांचा मुख्य पदांसाठी विचार करू नये, अशी मागणी जुन्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शहरपातळीवरील नेत्यांच्या गटबाजीला स्थान देऊ नये, निवडून आलेल्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जावा, संधिसाधूंना स्थान देऊ नये, अशी मागणी भाजपातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. महापौर निवडीनंतर स्थायी समिती, विधी, महिला बालकल्याण, क्रीडा व कला, शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण अशा विविध समित्यांच्या सदस्य आणि अध्यक्षांची निवड होणार आहे.
>निवडणूक कार्यक्रम
महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवड १४ मार्चला होणार आहे. ९ मार्चला महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. यंदा महापौरपद हे इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी एकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे. महापौरपदासाठी ९ मार्चला दुपारी तीन ते पाच या वेळेत महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात उमेदवारीअर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १४ मार्चला सकाळी ११ वाजता महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई हे पीठासन अधिकारी असतील.

Web Title: The Year of the Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.