यंदा जिल्ह्यात पावसाचे सीमोल्लंघन

By admin | Published: October 3, 2016 01:54 AM2016-10-03T01:54:13+5:302016-10-03T01:54:13+5:30

जून महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने आतापर्यंत तीन ‘इनिंग’ खेळून सर्वत्र पाणीच पाणी केले.

This year, the monsoon is expected to rain in the district | यंदा जिल्ह्यात पावसाचे सीमोल्लंघन

यंदा जिल्ह्यात पावसाचे सीमोल्लंघन

Next


पुणे : जून महिना कोरडा गेल्यानंतर पावसाने आतापर्यंत तीन ‘इनिंग’ खेळून सर्वत्र पाणीच पाणी केले. आता चौथी ‘इनिंग’ सुरू असून, रविवारी सकाळपर्यंत एकूण १२९४८.७ मिमी व सरासरी ९९६.१ मिमी पाऊस झाला आहे. संध्याकाळपर्यंत त्याने हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला. पावसाने बारामती, पुरंदर, शिरूर व जुन्नर तालुके वगळता सर्वच तालुक्यांत वार्षिक सरासरीचे सीमोल्लंघन केले आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण वार्षिक ८३०.१ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. गेल्या वर्षी ४३ दिवसांत ६६६.४ मिमी म्हणजे ८०.३ टक्के इतका पाऊस झाला होता. यावर्षी रविवारी सकाळपर्यंत ९९६.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
या वर्षी चांगला पाऊस होणार, अशी शक्यता हवामान विभाग व तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी चिंतेत होते. पण, जुलै महिना पाऊस घेऊन आला. पहिल्याच आठवड्यात त्याने जून व जुलै या दोन महिन्यांची सरासरी ओलांडली होती. त्यामुळे खरीप पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले. खरिपाच्या पेरण्याही चांगल्या झाल्या. जुलै महिन्याच्या १९ दिवसांत सरारसरी ३५० मि.मी. पाऊस पडला आहे. त्यानंतर आॅगस्टमध्ये पावसाची दुसरी इनिंग दमदार झाली. मात्र, त्यानंतर काही काळ पाऊस गायब झाला होता.
सप्टेंबरअखेर पावसाने तिसरी इनिंग सुरू करून पूर्व भागात सुरू झालेली पाण्याची ओरड थांबवली होती. आता पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)
>२४ तासांत ३३.३ मि.मी.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण १२९४८.७ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ९९६.१ मि.मी. आहे.
शनिवारी दुपारी अचानक पावसाने आपली चौथी इनिंग सुरू केली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात त्याने हजेरी लावली. भोर तालुक्यात सर्वाधिक ६७.६, त्यानंतर वेल्हा ४३.४, मुळशी ३९.२, बारामती ३९, इंदापूर ३७.९, शिरूर ३३, पुरंदर ३२, खेड २६, आंबेगाव २२.६, दौंड २0.९, जुन्नर १५.१ तर मावळ तालुक्यात १३.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
>या वर्षी पावसाचे ठिकाण असलेल्या जुन्नर तालुक्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. येथे सर्वसाधारण २ हजार ५२४ मि.मी. इतका सरासरी पाऊस होतो. यावर्षी आतापर्यंत १ हजार ८८ मि.मी.इतकाच झाला आहे. पूर्व भागात दमदार पाऊस झाला नव्हता; त्या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न जैसे थे होता. मात्र सप्टेंबरअखेर व आता आॅक्टोबरच्या सुरुवातील होत असलेल्या पावसामुळे याही तालुक्यांना दिलासा मिळाला आहे. येथील इंदापूर, दौंड या तालुक्यांनी वार्षिक सरासरी गाठली आहे. मात्र बारामती, शिरूर व पुरंदर हे तालुके सरासरीच्या जवळ आहेत.

Web Title: This year, the monsoon is expected to rain in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.