यंदाचा पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:48 PM2018-11-27T16:48:28+5:302018-11-27T16:56:00+5:30

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराचा या पुरस्काराने गौैरव करण्यात येतो.

This year P. Bhimsen Joshi classical music lifetime achievement award Keshav Ginday declared | यंदाचा पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित

यंदाचा पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. केशव गिंडे यांना घोषित

Next
ठळक मुद्देवेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये गिंडे यांनी अभूतपूर्व केले परिवर्तन १९८४ साली केशव वेणू या बासरीची निर्मिती बासरीची नोंद "लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडस् तसेच गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड

पुणे :  राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या नावाची घोषणा मंगळवारी मुंबई येथे केली. 
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकाराचा पं.भीमसेन जोशी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौैरव करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खान, सदानंद नायमपल्ली, शाम गुंडावार, श्रीमती भारती वैशंपायन, बाळ पुरोहित आणि  शुभदा पराडकर या मान्यवरांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती.  यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं.जसराज, श्रीमती प्रभा अत्रे, पं.राम नारायण, श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
पं.गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ साली पुणे येथे झाला. संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केलेली आहे. त्यांना बासरी वादनामध्ये अधिक रस होता. बासरी वादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वर, पं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. केशव गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. तसेच परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना शास्त्रीय संगीताचे प्रात्याक्षिकासह व्याख्याने दिलेली आहेत.
वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये गिंडे यांनी अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे. आणि त्यांनी आपल्या दादागुरु पं.पन्नालाल घोष यांच्या पाऊलखुणांवर चालत केशव वेणू या बासरीची निर्मिती १९८४ साली केली आहे. या बासरीची नोंद  "लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडस् तसेच गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी सात सप्तकात वाजवण्याचा गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. रसिक जन, संगीत तज्ञ, समीक्षक तसेच बासरी वादकांनी या नव्या संशोधनाचा गौरव केला आहे आणि येणाऱ्या बासरी वादकांसाठी ही बासरी आदर्श राहील असे वर्णन केले आहे. 
पं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.  पं.केशव गिंडे हे अमुल्य ज्योती पब्लिक ट्रस्ट चे अध्यक्ष असून संगीत आणि बासरी चा प्रचार-प्रसार-प्रबोधन, संशोधन व सवंर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे.   
श्री.गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिप, सहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगदगुरु शंकराचार्य श्रृंगेरी महापीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. ४ तपाहून अधिक काळात श्री.गिंडे यांच्याकडे हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

Web Title: This year P. Bhimsen Joshi classical music lifetime achievement award Keshav Ginday declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.