यंदा सीबीएसई दहावी निकालाचा टक्का वाढला : पुणे विभागाचा निकाल ९९ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:58 AM2019-05-07T11:58:59+5:302019-05-07T12:03:32+5:30
देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यंदा सीबीएसईचा निकाल ९१.१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने ९९ टक्के अशा विक्रमी निकालाची नोंद केली आहे. ९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आनंदाचा धक्का बसला आहे.
सीबीएसई दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान पार पडली होती. देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील १३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण घेऊन संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्पृहा सरनाईक ही विद्यार्थ्यांनी ९८.२ टक्के मिळवून शाळेत पहिली आली. विद्यार्थ्यांच्या निकालाची सरासरी ९२.०५ आहे. एकूण ८० मुले परीक्षेला बसली होती. लोकसेवा ई-स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून १८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
विखे-पाटील मेमोरियल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. आयुषी बर्वे ही विद्यार्थीनी ९८.२ टक्के मिळवून पहिली आली आहे. १४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सिटी इंटरनॅशनल स्कूल वानवडी शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. जान्हवी ऋषीकेश हिने ९७.४ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण ८४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
दिल्ली पब्लिक स्कूलच्या २२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. रिषभ गोयल हा विद्यार्थी ९८.३ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. जी जी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. आदित्य खानोलकर हा विद्यार्थी ९६.६ टक्के मिळवून पहिला आला.
विद्याशिल्प पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेचा सिध्दांत भट हा विद्यार्थी ९५.८ टक्के मिळवून पहिला आला. ब्लॉसम पब्लिक स्कूलची पायल हेलांबे ९८ टक्के मिळवून पहिली आली. आॅरबिस स्कूलची कवना अंकलेकर ९६.६ टक्के मिळवून पहिली आली.
...........
महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंगची बाजी
राजीव गांधी ई - लर्निंग स्कुलने सलग पाच वर्षे दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावत, परंपरा कायम राखली आहे. एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सृष्टी चिंतल हिला ८७ टक्के, आदर्श दोंतुल ८२. ८ टक्के , प्रियंका मिसाळ ८२ .६ टक्के गुण मिळवले.टक्क्यांचा पाऊस
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत देशभरातून एकूण २ लाख २५ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे सरासरी निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत.निकाल लवकर लावण्यातही पहिला नंबर
सीबीएसई बोर्डाने एसएससी, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत अवघ्या महिनाभरात दहावी व बारावीचा निकाल लावून पहिला नंबर पटकाविला आहे. यामुळे सातत्याने निकालाकडे वाट लावून बसलेल्या विद्यार्थी, पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.