यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 06:24 AM2020-07-30T06:24:23+5:302020-07-30T06:24:35+5:30

कोकण विभाग अव्वल; निकाल १८.२० टक्क्यांनी वाढला; मुंबईच्या निकालात १९.६८ टक्क्यांची वाढ

This year, the result of class X ssc is 95.30 percent | यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल

यंदा दहावीचा विक्रमी ९५.३० टक्के निकाल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला असून आत्तापर्यंतचा हा ऐतिहासिक निकाल आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही सावित्रीच्या लेकींनी निकालात बाजी मारली आहे. मुंबई विभागाचा निकाल ९६.७२ टक्के लागला असून मागील ५ वर्षांतील हा सर्वाधिक निकाल आहे.
राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.७७ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ९२ टक्के लागला आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली. मात्र, कोरोनामूळे भूगोल विषयाची परीक्षा रद्द करावी लागली. कोरोनामुळे निकालास उशीर झाला होता. बुधवारी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी निकाल जाहीर केला. दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाईव्ह ) पद्धतीने विद्यार्थांचा निकाल जाहीर करण्यात आला.
राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १९७७ पासून आत्तापर्यंत दहावीचा एवढा निकाल कधीही लागला नव्हता; त्यामुळे यंदाचा निकाल ऐतिहासिक आहे. मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेस राज्यातील १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील परीक्षेस प्रविष्ट झालेल्या १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांपैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुलींचा निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला असून मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.०१ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्य मंडळाने मार्च २०२० मध्ये पुन्हा अंतर्गत मुल्यमापन पध्दतीने परीक्षा (८० गुणांची लेखी व २० गुणांची तोंडी) घेतल्यामुळे यंदा निकालात १८.२० टक्क्यांनी वाढ झाली. राज्यातील केवळ ४.७० विद्यार्थी दहावीत अनुुत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला असून ५ लाख ३९ हजार ३७३ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत,५ लाख ५० हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. खासगीरित्या प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ७३.७५ टक्के लागला आहे.
कोरोनाच्या काळातही मंडळाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरू ठेवल्यामुळे २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर करणे शक्य झाले,असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षातील राज्याच्या निकालाची टक्केवारी
वर्ष टक्केवारी
२०१५ ९१.४६
२०१६ ८९.५६
२०१७ ८८.७४
२०१८ ८९.४१
२०१९ ७७.१०
२०२० ९५.३०

मराठवाड्याची पोरं हुशार
दहावीच्या परीक्षेत राज्यातील २४२ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले असून त्यात लातूर व औरंगाबाद विभागातील १८६ विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. यंदा राज्याचा निकालात चांगलीच वाढ झाली असून ८३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. मात्र, लातूर विभागातील १५१ विद्यार्थ्यांना व औरंगाबाद विभागातील ३६ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर विभागातील १५, पुणे व अमरावती विभागातील प्रत्येकी १२, कोकण विभागातील ११ नागपूर विभागातील ३ व मुंबई विभागातील २ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
मागील वर्ष वगळता गेल्या चार वर्षात राज्यातील १२५ हून अधिक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. २०१७ मध्ये १९३ विद्यार्थ्यांनी, २०१८ मध्ये १२५ विद्यार्थ्यांनी, २०१९ मध्ये २० विद्यार्थ्यांनी, तर २०२० मध्ये २४२ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून यश संपादन केले.

Web Title: This year, the result of class X ssc is 95.30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.