यंदाच्या हंगामात तांदळाचे ‘बंपर’ उत्पादन होणार
By admin | Published: January 8, 2015 01:34 AM2015-01-08T01:34:43+5:302015-01-08T01:34:43+5:30
यंदा मोठ्या प्रमाणात आलेले तांदळाचे उत्पादन व देशातून बंद असलेली निर्यात यामुळे देशभरात तांदळाचा ‘बफर स्टॉक’ झाला आहे.
विजयकुमार सैतवाल - जळगाव
यंदा मोठ्या प्रमाणात आलेले तांदळाचे उत्पादन व देशातून बंद असलेली निर्यात यामुळे देशभरात तांदळाचा ‘बफर स्टॉक’ झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव घसरून ‘बासमती’ही सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. शिवाय यंदा २५ ते ३० नवीन प्रकारच्या तांदळाला पसंती दिसून येत
आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ बाजारात यंदा पूर्णत: उलट चित्र आहे. गेल्या वर्षी देशातून वाढती निर्यात व अतिपावसाने उत्पादनात आलेली घट यामुळे तांदळाचे भाव प्रचंड वाढले होते. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला होता. यावर्षी मात्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पंजाब, हरीयाणा, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, कोकण या तांदूळ उत्पादक सर्वच प्रदेशात तांदळाचे विक्रमी उत्पादन झाले
आहे.
शिवाय देशातून तांदळाची निर्यात बंद असल्याने देशभर मागणीच्या तुलनेत सव्वापट तांदळाचा साठा उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम होऊन तांदळाचे भाव यंदा सरासरी ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहे. शिवाय बासमती तांदूळही ३००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटलने खाली आला आहे.
भाव कमी झाल्याने तांदळाला मागणी वाढली असून जो तांदूळ जास्त भावामुळे सामान्यांच्या आवाक्यात नव्हता त्याचीही खरेदी वाढून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात ‘चॉईस’ उपलब्ध आहे. यात २५ ते ३० नवीन प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्यामध्ये बासमतीमधील डी.पी. बासमती, पुसा बासमती, टेरीकॉट बासमती तसेच आंबेमोहर व इतर प्रकारच्या तांदळाचा समावेश
आहे.
यातील पुसा बासमती जो गेल्या वर्षी ९० ते १०० रुपये प्रती किलोवर गेला होता तो यंदा ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर आला आहे. आंबेमोहरचेही तसेच असून गेल्या वर्षी तो ६५ रुपये प्रती किलोवर होता मात्र यंदा तो ४२ ते ५० रुपये प्रती किलोवर आला आहे. यावरुन तांदळातील घसरणीचे चित्र लक्षात येते.
आवाक्यात आलेल्या तांदळातील डी.पी. व पुसा बासमती या तांदळाची लांबी शिजविल्यानंतर सव्वा दोन पट वाढते. त्यामुळे आता प्रचंड उत्पादनामुळे सामान्य ग्राहकही बासमतीचा आस्वाद घेऊ शकतात. बाजारात मोठ्या प्रमाणात तांदळाची आवक असल्याने ग्राहकांसाठी तांदूळ खरेदीची हीच योग्यवेळ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तांदळाचे भरघोस उत्पादन येण्यासह सध्या देशातून त्याची निर्यात तर बंद आहेच शिवाय तांदळाची खरेदी करणाऱ्या नाफेड, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) या संस्थांसह खाजगी कंपन्यांकडूनही तांदळाची अद्याप खरेदी सुरु झालेली नाही. त्यांच्याकडून खरेदी सुरु झाली तर तांदळाच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात आवक असल्याने बासमती तांदूळसुद्धा सामान्य ग्राहकाच्या आवाक्यात आहे.
गरजेनुसार उपलब्धता
एकत्र कुटुंबपद्धत नाहीशी होऊ लागल्याने कुटुंबाचा आकार लहान होत आहे. त्यामुळे धान्यासह सर्वच वस्तूंमध्ये छोट्या पॅकींगला मागणी वाढीला लागली. त्यानुसार तांदुळाचेही पाच किलोमध्ये सुद्धा पाकीट उपलब्ध आहे.
आवश्यकता आहे तोच घेतो जुना तांदूळ
ज्या ग्राहकाला तांदुळाचा लगेच वापर करायचा आहे, तोच जुना तांदूळ खेरदी करतो. अन्यथा बहुतांश ग्राहक याच काळात नवीन तांदळाची खरेदी करुन तो जुना होऊ देतात व नंतर त्याचा वापर करतात.
बासमती ९० ते १२०
पुसा बासमती४० ते ६५
टेरीकॉट बासमती३२ ते ३५
आंबेमोहर ४२ ते ५०
सुगंधी चिनोर २८ ते २९
कालीमुछ ३४ ते ३५
कोलम ३६ ते ३७
लच्छकारी कोलम४० ते ४२
भाव प्रति किलो