यंदा वारीचा मार्ग ‘निर्मल’

By Admin | Published: June 13, 2016 05:16 AM2016-06-13T05:16:41+5:302016-06-13T07:03:21+5:30

आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात.

This year the route of 'Nirmal' | यंदा वारीचा मार्ग ‘निर्मल’

यंदा वारीचा मार्ग ‘निर्मल’

googlenewsNext

यदु जोशी,

मुंबई- आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात. या पालख्या निघून गेल्या की, उघड्यावर शौचास बसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी आणि त्यातून रोगराईदेखील पसरते. मात्र, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून राज्य शासन दोन्ही मार्गांवर ‘निर्मल वारी’ ही अनोखी योजना राबविणार आहे.
तुकोबारायांच्या पालखीच्या मुक्कामाच्या १४ ठिकाणी प्रत्येकी ३००, माउलींच्या पालखी मुक्कामाच्या ११ ठिकाणी ५०० शौचालये, पंढरपूरमध्ये एक हजार, तर दोन्ही पालख्या जेथे एकत्र येतात, त्या वाखरीमध्ये ५०० शौचालये बसविण्यात येणार आहेत. तेथे जमणारा मैला जवळच्या सॉलिड ट्रिटमेंट प्लँटमध्ये नेऊन टाकला जाईल. जिथे असे प्लँट नसतील, तिथे एखाद्या शेतामध्ये खड्डा खणून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल आणि त्यातून खत तयार केले जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर अलीकडेच या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानचाच हा एक भाग असेल, असे त्यांनी सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. राज्य शासन आणि पुण्यातील सेवा सहयोग ही संस्था यांचा हा संयुक्त उपक्रम असेल. देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, सेवा सहयोगचे प्रकल्प संचालक नरेंद्र वैशंपायन, माजी खासदार प्रदीप रावत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय, रा.स्व.संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख संदीप जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हा उपक्रम साकारला आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर अशा शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.
>१० हजार स्वयंसेवकांची फळी
वारकऱ्यांनी या शौचालयांचाच वापर करावा, असे आवाहन प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे. कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, तसेच शौचालयांची व्यवस्था नीट व्हावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी २०० स्वयंसेवक तैनात असतील. अशा १० हजार स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लोणी व यवत येथे आणि काही दिवस पंढरपूरमध्येही प्रायोगिक तत्त्वावर या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: This year the route of 'Nirmal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.