यंदाचा सवाई भीमसेन महोत्सव ७ ते ११ डिसेंबरदरम्यान रंगणार

By admin | Published: November 17, 2016 04:06 AM2016-11-17T04:06:43+5:302016-11-17T04:06:43+5:30

देश-विदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी दि. ७ ते ११ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे.

This year, the Sawai Bhimsen Festival will be held from December 7 to 11 | यंदाचा सवाई भीमसेन महोत्सव ७ ते ११ डिसेंबरदरम्यान रंगणार

यंदाचा सवाई भीमसेन महोत्सव ७ ते ११ डिसेंबरदरम्यान रंगणार

Next

पुणे : भारतीय अभिजात संगीत क्षेत्रातील संगीतशिरोमणी पं.जसराज, डॉ. प्रभा अत्रे अशा दिग्गज कलावतांसह एस. बल्लेश व कृष्णा बल्लेश, रितेश व रजनीश मिश्रा, देबोप्रिया व सुचिस्मिता, ब्रजेश्वर मुखर्जी, डॉ. म्हैसूर मंजुनाथ, धनश्री घैसास आणि ताकाहीरो अराई यांसारख्या नवोदितांच्या आविष्कारांची सुरेल मेजवानी यंदाच्या ६४ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’त रसिकांना मिळणार आहे. जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी रेखाटलेले महोत्सवाचे नवीन बोधचिन्ह महोत्सवाचे वेगळेपण ठरणार आहे.
देश-विदेशांतील रसिकांच्या पसंतीस उतरलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यावर्षी दि. ७ ते ११ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या मैदानावर पाच दिवस आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे वेळापत्रक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याचबरोबर महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरणदेखील या वेळी करण्यात आले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची (७ डिसेंबर) सुरुवात भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य एस. बल्लेश आणि त्यांचे चिरंजीव कृष्णा बल्लेश यांच्या सनईवादनाने होईल. २०१६ हे वर्ष भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, महोत्सवाचा पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात येणार आहे. यानंतर ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर, गौरी पाठारे यांचे गायन होईल; तसेच इमदादखानी घराण्याचे उस्ताद इमरत खान यांचे चिरंजीव आणि शिष्य उस्ताद इर्शाद खान यांचे ‘सूरबहार’ या सतारीशी मिळत्या-जुळत्या वाद्याचे सादरीकरण होईल. पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. गणपती भट यांच्या सुरेल गायनाने होईल.
दुसऱ्या दिवशी (८ डिसेंबर) रसिकांना बनारस घराण्याचे रितेश व रजनीश मिश्रा यांचे गायन ऐकण्याची संधी मिळेल. रितेश व रजनीश हे ज्येष्ठ गानबंधू पं. राजन मिश्रा यांचे चिरंजीव आणि शिष्य असून, ते यावर्षी प्रथमच आपली कला महोत्सवात पेश करतील. नंतर, पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या शिष्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता या भगिनी आपल्या बासरी वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. यानंतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या मंजिरी असनारे-केळकर यांचे गायन होईल. मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड, पं. जसराज यांच्या गायनाने सांगता होईल.
पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांचे शिष्य ब्रजेश्वर मुखर्जी यांच्या गायनाने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीची सुरेल (९ डिसेंबर) सुरूवात होईल. तसेच, डॉ. म्हैसूर मंजुनाथ व म्हैसूर नागराज हे बंधू कर्नाटकी अंगाच्या व्हायोलीनची जुगलबंदी सादर करतील. यानंतर हैदराबादच्या भरतनाट्यम पारंगत पूर्वाधनश्री यांचे नृत्य होईल. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीनही घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे व गजानन बुवा जोशी यांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर यांच्या शास्त्रीय गायनाने मैफिलीची सांगता होईल.
४महोत्सवात चौथ्या दिवशी (१० डिसेंबर) ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांची शिष्या धनश्री घैसास प्रथमच आपली गायन कला रसिकांसमोर सादर करेल. नंतर श्रीनिवास जोशी यांच्या गायनासह दिल्लीस्थित लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधंूचे सतार आणि सरोदवादन होईल. डागर घराण्याचे सुप्रसिद्ध पं. उदय भवाळकर यांच्या धृपद गायनानंतर या सत्राची सांगता कर्नाटक संगीतातील ख्यातनाम व्हायोलीनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम आणि त्यांचे पुत्र अंबी यांच्या सहवादनाने होणार आहे.
४महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी (११ डिसेंबर) जगप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे जपानी शिष्य ताकाहीरो अराई यांचे संतूर वादन रंगणार आहे. तसेच, किराणा घराण्याचे गायक आणि पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य आणि सुपुत्र कैवल्यकुमार यांचेदेखील गायन होणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान आपले शिष्य आणि सुपुत्र अमान अली बंगश आणि अयान अली बंगश यांच्याबरोबर सहवादन करतील. परंपरेप्रमाणे महोत्सवाचा समारोप किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांच्या गायनाने होणार आहे.

Web Title: This year, the Sawai Bhimsen Festival will be held from December 7 to 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.