...तर वर्ष वाया जाणार नाही !

By admin | Published: June 9, 2015 04:18 AM2015-06-09T04:18:56+5:302015-06-09T04:18:56+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

... the year will not be wasted! | ...तर वर्ष वाया जाणार नाही !

...तर वर्ष वाया जाणार नाही !

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. परीक्षेचा ८०/२० पॅटर्न आणि बेस्ट आॅफ फाइव्हमुळे गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या निकालाचा टक्का वाढत आहे. त्यातही या परीक्षेत कमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटीची सवलत दिली आहे.
सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटीची सवलत देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये तात्पुरता प्रवेश मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषय घेऊन आॅक्टोबर २०१५मध्ये आयोजित मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ट होणे अनिवार्य आहे. यामध्ये पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास मार्च २०१६च्या परीक्षेमधील संधी अंतिम राहील. या संधीमध्येही एटीकेटी प्राप्त विषयांमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण न झाल्यास त्याचा अकरावीचा प्रवेश रद्द करण्यात येईल. राज्य शासनाच्या ३० नोव्हेंबर २०११च्या निर्णयानुसार राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळाडू विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस अनुत्तीर्ण होतील, अशाच खेळाडू विद्यार्थ्यांना २५ गुणांपर्यंत सवलत दिली आहे.

रात्र शाळेचा निकाल
दहावी परीक्षेसाठी रात्र शाळेतून नोंदणी केलेल्या ४ हजार ७७६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ८१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल

61.33%
लागला आहे. एकट्या मुंबई विभागातून रात्र शाळाअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार १३० होती. मुंबई विभागातील १ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जातील. आॅनलाइन निकालानंतर संबंधित विभागीय मंडळाकडे निकालापासून २९ जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

गुणपडताळणीची सुविधा
ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, मूळ गुणपत्रिकेच्या छायाप्रतीसह विहित नमुन्यात, विहित शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे १५ ते २५ जून या कालावधीतपर्यंत अर्ज करावयाचा आहे.

श्रेणी/गुणसुधार योजना
श्रेणी/ गुणसुधार (क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम) योजनेंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी सप्टेंबर/आॅक्टोबर २०१५ किंवा मार्च २०१६ पुन्हा परीक्षा देता येईल.

सर्वोत्तम पाच (बेस्ट आॅफ फाइव्ह) निकष
सहा अनिवार्य विषयांपैकी अधिक टक्केवारी असलेल्या पाच विषयांचे एकूण गुण व टक्केवारी गुणपत्रिकेत दर्शविण्यात आलेली आहे. मात्र उत्तीर्णतेचे निकष व अन्य सवलती प्रचलित पद्धतीनुसार ठेवल्या आहेत.

अपंगांनीही
घेतली भरारी
अपंग विद्यार्थ्यांनीही भरारी घेतली असून, हा निकाल ८७.४६ टक्के लागला. त्यामध्ये अंध विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून, ९३.९१% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ६,१४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
एकूण ५ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ८८७ अंध विद्यार्थी होते. त्यापैकी ८३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्चमधील परीक्षेपासून गतिमंद असलेल्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक तासाला २० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आला. तसेच गतवर्षी मार्चच्या परीक्षेपासून सिकलसेल व थॅलेसिमिया असलेल्या विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात येत आहे.

Web Title: ... the year will not be wasted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.