यंदाही अवकाळीचे संकट !

By admin | Published: April 23, 2015 02:20 AM2015-04-23T02:20:50+5:302015-04-23T02:20:50+5:30

भेंडवळची घटमांडणी; चांगल्या पावसाचे भाकीत.

This year's crisis! | यंदाही अवकाळीचे संकट !

यंदाही अवकाळीचे संकट !

Next

जयदेव वानखडे/ जळगाव जामोद (बुलडाणा) : सुमारे ३00 वर्षांंची परंपरा असलेल्या विदर्भातील बहूचर्चित भेंडवळ घटमांडणीत यंदाही अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील, असे म्हटले आहे. राजकीय भाकीतानुसार, देशाचा राजा कायम राहणार असला तरी, संकटाचा ताण राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या मांडणीचे उद्गाते चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज व त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी बुधवारी हे भाकीत वर्तविले. गतवर्षी वर्तविलेला सत्ता बदलाचा अंदाज तंतोतंत ठरला होता. शेतकर्‍यांसोबतच राजकारण्यांची उपस्थिती ही यावेळच्या घटमांडणीचे वैशिष्ट्य होते. राजकारणाचे भाकीत वर्तविण्यासाठी घटातील मातीच्या खड्यामध्ये विडा व त्यावर लाल सुपारी ठेवली जाते. यावेळी विड्यावरील पान सुपारी कायम होती; परंतु पानावर माती दिसून आली. त्यामुळे राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील; मात्र आर्थिक आणि संकटाचा ताण राहील. त्यामुळे राजाला चिंता सतावेल. अतवृष्टी, पिकांची नासाडी, अवकाळी पाऊस, त्सुनामी, भूंकप, शंत्रुंची घुसखोरी अशा प्रकारच्या संकटांना पंतप्रधानाला (राजाला) सामोरे जावे लागेल. गतवर्षी घटाचे अवलोकन करताना विड्याच्या पानावरून सुपारी खाली घसरलेली आढळून आली होती. त्यामुळे राजाची गादी कायम राहील; परंतु राजा बदलेल, असे भाकीत वर्तविण्यात आले होते. अवकाळी पावसाचे संकट यावर्षीही कायम राहणार असून, पावसाळा चांगला राहील. या हंगामात पावसाचे प्रमाण चांगले असून, पीक परिस्थितीही साधारण चांगली राहील. त्यामध्ये कपाशीच्या पीकाबद्दल चांगला अंदाज वर्तविण्यात आला असून, या पिकाला भावातही तेजी मिळेल. ज्वारीचे पीक चांगले येईल; मात्र नासाडी संभवते, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. तुरीचे पीक चांगले राहील. मूग, उडीद, हिवाळी मूग, वाटाणा, गहू, हरभरा आदी पिकांबाबत यावेळी अनिश्‍चितता वर्तविण्यात आली. त्यामध्ये काही भागात चांगली, तर काही भागात साधारण पिके येतील असा अंदाज वर्तविण्यात आला. यंदा खरीप हंगाम हा रब्बी हंगामापेक्षा बरा असेल. अवकाळी पावसामुळे रब्बीची पिके हातातून जातील. त्यातुलनेत खरिपाची पिके बरी येतील, असे भेंडवळच्या मांडणीत म्हटले आहे. पिकावर रोगराईचे प्रमाण वाढेल, पिकांची नासाडी होईल, जलाशये तुडुंब भरलेले असतील, परंतू चारटंचाईचे सावट यावर्षीही जाणवेल, अतवृष्टीने महापूर, त्सुनामी, भूकंप अशी नैसर्गिक संकटे पृथ्वीवर येतील, त्यामध्ये जिवीत हानी होईल, देशावर परकीय शत्रुंच्या कारवाया सुरुच राहतील, मात्र देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असल्याने या संकटाचा मुकाबला करता येईल, असेही भाकीत वर्तविण्यात आले. आर्थिक संकटांमुळे तिजोरीत खणखणाट राहील, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.

Web Title: This year's crisis!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.