यंदाच्या दिवाळीवर मंदीचे सावट!
By Admin | Published: October 31, 2016 03:36 AM2016-10-31T03:36:34+5:302016-10-31T03:36:34+5:30
दिवाळीसाठी मनोरचा बाजार फुलला मात्र त्यात चायनाच्या वस्तूंप्रमाणेच ग्राहकांनाही खो बसलेला दिसत होता.
मनोर : दिवाळीसाठी मनोरचा बाजार फुलला मात्र त्यात चायनाच्या वस्तूंप्रमाणेच ग्राहकांनाही खो बसलेला दिसत होता. स्वदेशी वस्तूंना दुकानदारांनी पसंती दिली होती परंतु त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक मात्र येत नव्हते. फॅन्सी फटाक्यांचा अपवाद वगळता अन्य वस्तूंच्या विक्रीवर मंदीचे सावट होते.
पन्नास ते साठ गावासाठी मनोर ही एकमेव बाजार पेठ असून बाजारात लोकांची गेल्या तीन दिवसांपासून ये-जा सुरु होती. यंदा सर्व फटाक्यांच्या दुकानांनी चायनीज फटाक्यांवर बहिष्कार टाकला होता. अन्य दुकानेही स्वदेशी मालाने भरलेली असली तरी ग्राहक फारसे नसल्याने दिवाळीच्या आधी आठ दिवस भरणारा हा बाजार यंदा फक्त तीन दिवस भरला. त्यावरही मंदीचे सावट होते.
मनोर परिसर हे ग्रामीण भाग असल्याने येथील आदिवासी, कुणबी समाज मोठया प्रमाणात भात शेती करतो त्या भात व गवत विक्र ीतून येणाऱ्या पैशावरच तो दिवाळी साजरी करतो.
परंतु यंदा भात व गवत कापणी वेळेवर न झाल्याने बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांना दिवाळीची खरेदी हवीतशी करता आली नाही. लोकांकडे पैसेच नसल्याने दुकानातील माल पाहिजे तसा खपला नाही . त्यामुळे माल पडून राहणार आहे व त्यातील गुंतवणूकही अडकून राहणार आहे. असे सुनील लोखंडे, कांतीलाल जैन, सचिन घोलप, विनोद जैन, विवेक लोखंडे, स्वप्नील यादव, संतोष लोखंडे व इतर दुकानदारांनी लोकमतला सांगितले.
>आत्ताशी खरेदी केंद्रे सुरू
संपूर्ण पालघर जिल्ह्यात एकाधिकार भात खरेदीची केंद्रे रविवारी सुरू झालीत. तरी त्यांचा दिवाळीच्यादृष्टीने शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. कारण अजून भाताचे पीक हाती आले नाही. ते येण्यास आठ दिवस जातील. नंतर खरेदी होईल व तिचे पैसे हाती कधी येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.