यंदा हज यात्रेसाठी अर्ज भरा आॅनलाइन!
By admin | Published: January 17, 2015 03:41 AM2015-01-17T03:41:46+5:302015-01-17T03:41:46+5:30
आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रा करावी, अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते. मर्यादित जागांमुळे अनेकांना हज यात्रेसाठी जाता येत नाही.
औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रा करावी, अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते. मर्यादित जागांमुळे अनेकांना हज यात्रेसाठी जाता येत नाही. हज यात्रा २०१५ या वर्षासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. हज कमिटी आॅफ इंडियाने यंदा भाविकांना अर्ज आॅनलाईन भरण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे दहा वर्षे वैध असलेला पासपोर्ट सोबत जोडणे आवश्यक आहे.
हज यात्रेसाठी गतवर्षी महाराष्ट्रातून ४८ हजार नागरिकांनी अर्ज केला होता. त्यातील फक्त ८ हजार यात्रेकरूंनाच संधी मिळाली होती. तीन वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला १० हजारांहून अधिक जागा येत होत्या. महाराष्ट्राचा कोटा दोन हजारांनी कमी करण्यात आल्याने हज कमिटीमार्फत यात्रेला आपला क्रमांक लागावा म्हणून स्पर्धा वाढली आहे.
१९ जानेवारीपासून भाविकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. शिवाय हार्ड कॉपीमध्येही अर्ज भरून स्टेट हज कमिटीकडे द्यावा लागेल. यात्रेकरूंना हज यात्रेसाठी लागणारी रक्कमही आॅनलाईन भरून द्यावी लागेल. २० फेबु्रवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी कधीच हज केलेले नाही अशा भाविकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून सतत अर्ज केल्यानंतरही ज्यांचा हज यात्रेसाठी नंबर लागला नाही, त्यांना यंदा संधी मिळणार आहे.
नियोजित जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने अर्ज काढण्यात येतील. १६ ते २४ मार्चदरम्यान ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मरकज- ए- हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी दिली. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे ८१ हजार रुपयांचा पहिला टप्पा भाविकांना जमा करावा लागेल. १७ आॅगस्ट २०१५ पासून हज यात्रेकरूंचे पथक् रवाना होईल. २२ सप्टेंबरपासून पवित्र हज यात्रेला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)