मुंबईत खड्ड्यांचा यंदा नवा विक्रम
By admin | Published: August 22, 2016 05:56 AM2016-08-22T05:56:55+5:302016-08-22T05:56:55+5:30
मुंबईच्या रस्त्यावर कमी खड्डे असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ अखेर उघडे पडले आहे़
शेफाली परब,
मुंबई- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या रस्त्यावर कमी खड्डे असल्याचा दावा करीत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या महापालिका प्रशासनाचे पितळ अखेर उघडे पडले आहे़ पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही शहर व उपनगरातील खड्ड्यांची संख्या ३७०० वर पोहोचली आहे़ सर्वाधिक खड्डे पश्चिम उपनगरांमध्ये असल्याचे दिसून येत आहे़
दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही मुंबई खड्ड्यांतच गेली. त्यात एप्रिल महिन्यात उघड झालेल्या घोटाळ्याने रस्त्यांच्या कामांचे बिंग फोडले. तरीही गेल्यावर्षी यापेक्षा अधिक खड्डे होते, असा दावा करीत आपली अब्रू वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिका प्रशासनामार्फत सुरू होता़ मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील खड्ड्यांनी गतवर्षीचा विक्रम मोडला आहे़
२०१५ मध्ये या काळात मुंबईच्या रस्त्यांवर तीन हजार ४९१ खड्डे पडले होते़ यंदा तीन हजार ६३८ खड्डे मुंबईच्या रस्त्यांवर पडले आहेत़ यापैकी आता केवळ १५९ खड्डे भरणे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे़ मात्र या आकडेवारीवरून खड्डे बुजविण्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे़
>उपनगरे खड्ड्यांत
वांद्रे ते दहिसरपर्यंत असलेल्या पश्चिम उपनगरातील रस्ते सर्वाधिक खड्ड्यांत असल्याचे दिसून आले आहे़ अंधेरीत ४१५, मालाड-मालवणी ३८९ तर बोरीवलीत ५५१ खड्ड्यांची नोंद झाली आहे़
>खड्ड्यांत गेलेले वॉर्ड
बोरीवली विभाग हा सर्वाधिक खड्ड्यांत गेलेला विभाग ठरला आहे़ तेथील रस्त्यांवर ५५१ खड्डे पडले आहेत़ तर कुलाबा, फोर्ट, चर्चगेटमध्ये १६७ आणि दादरमध्ये २१६ खड्डे पडले आहेत़ त्यापाठोपाठ पूर्व उपनगरात कुर्ला आणि गोवंडी, मानखुर्द हा विभाग खड्ड्यांत आहे़ १६० ते १७० खड्ड्यांची या विभागांमध्ये नोंद झाली आहे़