यंदाचा पाऊस समाधानकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:10 AM2020-05-31T06:10:36+5:302020-05-31T06:10:57+5:30

कंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येईल.

This year's rain is satisfactory | यंदाचा पाऊस समाधानकारक

यंदाचा पाऊस समाधानकारक

googlenewsNext

- सचिन लुंगसे


मुंबई : मान्सून यंदा शेतीसाठी पूरक आहे. मान्सूनसाठी हानीकारक असलेला अल निनो न्युट्रल आहे. ला निना मान्सूनला अनुकूल ठरतो. मान्सूनच्या मध्यात ला निनो तयार होईल. हे आपल्यासाठी सुचिन्ह आहे. एकंदर यंदाचा मान्सून देशासाठी सरासरीपेक्षा अधिक पाऊस घेऊन येईल. तो देशासाठी, बळीराजासाठी समाधानकारक असल्याचा विश्वास मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला. यंदाच्या पावसात मुंबईकरांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत.


मान्सूनचे पूर्वानुमान कसे आहे?
देशासाठी हवामान खात्याने दीर्घकालीन पूर्वानुमान दिले आहे. जून ते सप्टेंबरदरम्यानचा पाऊस सरासरीएवढा असेल. म्हणजे सर्वसाधारण असेल. सर्वसाधारण पावसात ९६ टक्के ते १०४ टक्के एवढा पाऊस गृहीत धरला जातो. देशाचा सरासरी पाऊस हा ८८ सेंटीमीटर आहे. हेच जर आकडेवारीत सांगायचे झाल्यास संपूर्ण देशाचा पाऊस त्याच्या सरासरीच्या १०० टक्के पडेल.


दीर्घकालीन पावसाच्या दुसऱ्या टप्प्याचे पूर्वानुमान कधी जाहीर होईल?
हे पूर्वानुमान लवकरच जाहीर केले जाईल. यात जुलै आणि आॅगस्टमध्ये किती पाऊस पडेल, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस कसा असेल? देशाच्या चार भौगोलिक भागांत पाऊस कसा असेल? याचा अंदाज दिला जाईल. यात मध्य, ईशान्य, दक्षिण, उत्तर पश्चिम भारताचा समावेश आहे.


महाराष्ट्रात मान्सून कसा कोसळेल?
मान्सून मिशन मॉड्युलनुसार पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक असेल. दक्षिण आशियाचा विचार करता संपूर्ण देशात सर्वदूर सरासरीएवढा पाऊस पडेल. दक्षिण भारत, उत्तर पश्चिम भारतात पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल. महाराष्ट्रातही पाऊस सरासरीएवढा कोसळेल. कोकण, मध्य भारत, मराठवाडा, विदर्भात किती पाऊस पडेल, हेदेखील आपण सांगतो. मात्र या मॉड्युलमध्ये काही त्रुटी असतात. त्यामुळे हे आपण मार्गदर्शक म्हणून वापरता येईल, असेही सांगतो. जसजसा भूभाग कमी होतो तसतशा त्रुटी वाढतात.


मान्सूनबाबत व्हायरल होणाºया संदेशांबाबत काय सांगाल?
चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नका. या दिवसांत अनेक तज्ज्ञ निर्माण होतात. त्यांचा काय अभ्यास आहे, किती अनुभव आहे? हे लोक पाहत नाहीत. मात्र याबाबतचे संदेश समाज माध्यमांवर पसरतात. अशावेळी शेतकरी, सामान्यांनी याकडे सावधपणे बघण्याची गरज आहे.


मुंबईकरांनी काय खबरदारी घ्यावी?
मुंबईकर कधी थांबला नाही. कोरोनामुळे मुंबईकर थोडा खचला आहे. उन्हाळ्यात कोरोना मरेल का? असे प्रश्न लोकांनी विचारले. मात्र तसे काही झाले नाही. आता पावसात कोरोना धुऊन जाईल का? असे प्रश्न विचारले जात आहेत. प्रत्यक्षात असा कोणत्याही प्रकारचा अभ्यास, अहवाल कोणाकडेही उपलब्ध नाही. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांनी खबरदारी घ्यावी. या पावसात आपल्याला सावधपणे काम करावे लागेल. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दर १५ मिनिटांनी पावसाचे मोजमाप दिले जाणार आहे. याचा मुंबईकरांना फायदा होईल. बोरीवली, पवई असे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या पावसाचे अपडेट मिळतील.


शेतकऱ्यांना काय सांगाल?
हवामान विभाग दर मंगळवारी आणि शुक्रवारी कृषीविषयक पूर्वानुमान देते. शेतकºयांनी पाच दिवसांचे कृषीविषयक पूर्वानुमान बघावे. हवामान खात्याच्या संकेतस्थळावर हवामानातील वेगवान घडामोडींचे संदेश असतात ते पाहावेत. कृषी विद्यापीठ, मेघदूत, उमंगसारख्या अ‍ॅपची मदत घ्यावी. याची माहिती ग्रामपंचायतीत दिली जाते. काही शेतकरी खूप हुशार आहेत. त्यांचे मला फोन येतात. हवामानाविषयी ते माहिती घेतात. शेतकरी सजग आहे. शेतकरी हुशार आहे. त्याला कोणी चुकीची माहिती देऊ नये.

Web Title: This year's rain is satisfactory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.