येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:48 PM2018-12-13T19:48:36+5:302018-12-13T19:55:41+5:30
कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय...
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय..खंडेरायाच्या जेजुरी गडावर राज्यभरातून आलेल्या एक लाखांवर भाविकांनी गर्दी केली होती.येळकोट येळकोट जयमल्हार च्या गजरात कुलदैवताचे दर्शन घेतले. वांग्याचे भरीत, कांद्याची पात, आणि रोडग्याच्या महाप्रसादाने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली.
मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या खंडेरायाच्या षडरात्र उत्सवात घटस्थापना, होमहवन, यज्ञयाग, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भाविकभक्तांसाठी विविध मिष्टान्न महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये किमान एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला शिवशंकरांनी मार्तंडभैरवाचा अवतार धारण करून ऋषी -मुनी आणि देव गणांचा छळ करणार्या मणी -मल्ल दैत्यांचा संहार केला हे युद्ध सहा दिवस चालले. म्हणून हा उत्सव सहा दिवस चालतो याला षडरात्र उत्सव देखील म्हणतात. तसेच आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी असे ही सबोधले जाते. या नवमीपसून खंडोबा भक्त चातुर्मास पाळतात, या काळात कांदा, वांगे खान्यातून वर्ज केले जाते, मात्र कुलदैवत खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सवाला कुलदैवताला भरीत रोडग्याचा नैवद्य अर्पण करून कांदा-वांगे खाण्यास सुरुवात होते. म्हणून या उत्सवाला "वांगेसट" असे ही म्हणतात.
परंपरेनुसार खंडोबा गडावर सहा दिवसांच्या उत्सवाचे नियोजन जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे, बाळकृष्ण दीडभाई, अविनाश सातभाई ,प्रशांत सातभाई, हरिभाऊ लांघी, सतीश कदम, नितीन बारभाई, श्री मार्तंड देवसंस्थानचे सर्व विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी, जेजुरीकर ग्रामस्थ, खांदेकरी -मानकरी, सेवेकरी यांचेवतीने करण्यात आले होते. काल बुधवारी (दि.१२) सायंकाळचे सुमारास देवांचा तेलहंडा वाजत गाजत गडकोटावरून शहरातील चावडीत आणण्यात आला .यावेळी शिंदे,माळवदकर व खोमणे पाटील, झगडे फुलारी यांनी तेलहंड्याला मान दिला .यानंतर मुख्य मंदिरात श्रींच्या मूर्तींना तेलवनाचा विधी पार पडला. आज गुरुवारी (दि.१३) पहाटेच्या ग्रामस्थ व मानकरी यांच्यावतीने करण्यात आलेल्या महापूजा -आरतीनंतर बालद्वारीतील देवांचे घट उठवण्यात आले. आणि उत्सवमूर्ती वाजत -गाजत मुख्य मंदिरात नेण्यात आल्या. सहा दिवसांच्या काळात भाविकभक्तांच्या वतीने मुख्य मंदीरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येत होती. तसेच गडकोटाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळची महापूजा देवसंस्थानच्या वतीने करण्यात आली यावेळी पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख उपस्थित होते. चंपाषष्ठी उत्सवानिमित्त गडकोट आवारात कांद्याची पात, वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, आदी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ग्रामीण भागातुन आलेल्या भाविक भक्तांनी देवदर्शन,दिवटी पाजळून तळीभंडार, आदी धार्मिक विधी केले. कुलदैवताचे मूळ स्थान असणार्या कडेपठार मंदिरात ही भाविकांची मोठी गर्दी होती.गुरुवारी सकाळ पासूनच जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी होती. मुख्य रस्त्यांवरून वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. जेजुरी पोलिस ठाण्याचे स. पो.नि. अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांनी वाहतुकीबरोबरच बंदोबस्त चोख ठेवला होता.