कल्याण पूर्वेत पिवळे पाणी
By admin | Published: April 27, 2016 03:59 AM2016-04-27T03:59:49+5:302016-04-27T03:59:49+5:30
कल्याण पूर्वेत कायमच असलेल्या पाणीटंचाईत आता गढूळ-पिवळ््या रंगाच्या पाण्याची भर पडली आहे.
कल्याण : सध्या पाणीटचाई वगंभीर बनली असली तरी कल्याण पूर्वेत कायमच असलेल्या पाणीटंचाईत आता गढूळ-पिवळ््या रंगाच्या पाण्याची भर पडली आहे. तीन दिवस पाणीबंद आणि उरलेल्या चार दिवसांत कमी दाबाने पुरवठा, तोही पिवळ््या रंगाच्या पाण्याचा असी स्थिती असल्याने, काविळीसह पोटाच्या विकाराचे रूग्ण वाढत असल्याने सर्वत्र संताप खदखदत आहे.
पूर्व भागातील विठ्ठलवाडी परिसरात कल्याण एण्डपाईंटला खडेगोळवलीजवळसाई चाळ आणि संगम चाळीत केवळ दोनच तास पाणीपुरवठा होतो. पाण्यासाठी या कॉलनीत महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. धरणात अपुरा पाणीसाठा असल्याचे सांगून पालिकेने आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. केवळ चार दिवस नळाला पाणी येते. तेही पुरेसे येत नाही. अनियमित-कमी दाबाच्या पाणीपुरवठ्यामुळे केवळ दोन तास झुंबड उडते. नळाला येणारे पाणी पिवळे-दूषित असल्याने हे कसे पिणार? त्याचा इतर कामासाठीच वापर करावा लागतो. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करुनही त्याची योग्यप्रकारे दखल घेतली जात नाही, अशी तक्रार साईबाबा चाळीत राहणाऱ्या श्रद्धा पेडणेकर यांनी केली आहे. तसेच संगम चाळीत राहणाऱ्या राजेश्वरी बेहरा यांनीही पाणीटंचाईचा मुद्दा मांडला आणि येणारे पाणी दूषित असल्याचे सांगितले.
कल्याण पूर्वेतील ३२ क्रमांकाच्या प्रभागात राहणारे नागरिक दूषित पाण्याची तक्रार गेले महिनाभर पालिका प्रशासनाकडे करीत आहेत. हा प्रभाग उंच सखल आहे. अनेक जलवाहिन्या गटारातून गेल्या आहे. त्यांना अनेक टिकाणी गळती असल्यने, त्या गंजलेल्या असल्याने पुरवठा बंद असतो, त्यावेळी गटाराचे पाणी जलवाहिनीत शिरते. पण जलवाहिन्या दुरुस्त करण्याकडे महापालिकेचे लक्ष नाही.
दूषित पाण्याविषयी शिवसेनेचे नगरसेवक नीलेश शिंदे यानी आवाज उठविला होता. प्रशासनाला नेमका कुठून दूषित पाणी पुरवठा होतो, याचा शोध घेता आलेला नाही याविषयी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विठ्ठलवाडी संगम कॉलनी आणि साईबाबा कॉलनीत ही स्थिती नाही. दुर्गामंदिर रोड, लक्ष्मीबाग, तीसगावनाका, कोळसेवाडी, विजयनगर, गणेशवाडी, शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी परिसरातील नागरिकांनीही दूषित पाण्याविषयी तक्रारी केल्या आहेत.