येरवडा कारागृहातही भरणार आठवडी बाजार!
By Admin | Published: January 3, 2017 04:47 AM2017-01-03T04:47:09+5:302017-01-03T04:47:09+5:30
पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी बुधवारपासून संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार सुरू होणार आहे.
मुंबई : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी बुधवारपासून संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार सुरू होणार आहे. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांना थेट शेतकऱ्यांकडून स्वस्त व ताजा भाजीपाला मिळणार आहे. या उपक्रमामुळे नव्या वर्षात शेतकरी व पोलिसांचे भावबंध जोडले जाणार आहे.
राज्याच्या गृह मंत्रालयाअंतर्गत येणारे येरवडा कारागृह प्रशासन आठवडी बाजाराचा उपक्रम सुरू करणारा शासनाचा राज्यातील पहिला विभाग ठरला आहे. मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात पहिला आठवडी बाजार सुरू झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी हे बाजार सुरू होत आहे. आठवडी बाजारामुळे कोणत्याही मध्यस्थाविना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. येरवडा कारागृह येथील वसाहतीत सुमारे ९०० पोलीस अधिकारी व कर्मचारी कुटुंबासह राहतात. पोलिसांससह परिसरातील रहिवाशांना दर बुधवारी शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला, फळे, कडधान्ये व विशेष म्हणजे बाजारभावापेक्षा कमी दरात दूध मिळणार आहे, असे या उपक्रमाच्या समन्वयक व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
उपक्रमाबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्वाती साठे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन केले. कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येरवडा कारागृहाच्या अर्जाला तातडीने मंजुरी दिली. बुधवारी दुपारी कारागृह कर्मचारी वसाहतीच्या मोकळ््या जागेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)