हो, लेखकांचीही होतेय फसगत..

By admin | Published: June 23, 2016 02:32 AM2016-06-23T02:32:29+5:302016-06-23T02:32:29+5:30

इकडच्या तिकडच्या वाचलेल्या कथांची चोरी करून स्वत:च्या नावावर त्या खपवल्या जातात आणि त्यावर चित्रपट काढला जातो. त्याचे श्रेय लेखकांना देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही.

Yes, the authors are also fatal. | हो, लेखकांचीही होतेय फसगत..

हो, लेखकांचीही होतेय फसगत..

Next

पुणे : इकडच्या तिकडच्या वाचलेल्या कथांची चोरी करून स्वत:च्या नावावर त्या खपवल्या जातात आणि त्यावर चित्रपट काढला जातो. त्याचे श्रेय लेखकांना देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही. लेखक हा सरळमनाचा असतो, पण नेहमीच त्याच्यावर अन्याय होतो. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळते अरे ही तर आपल्याच कथेशी सुसंगत आहे. यामध्ये लेखकांची मोठ्या प्रमाणावर फसगत होते, अशा शब्दांत काही लेखक मंडळींनी व्यथांना वाट मोकळी करू दिली.
सध्या यशोशिखरावर असलेल्या ‘सैराट’ची गाडी कोटीची भरारी घेत सुसाट धावत असली,तरी त्याला खोडा घालणारे अनेक वाद नव्याने समोर येऊ लागले आहेत. ‘बोभाटा’ या आपल्या कादंबरीवरून या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली असल्याचा दावा लेखक नवनाथ माने यांनी केला आहे. यासंदर्भात स्वामित्व हक्क (कॉपीराईट अ‍ॅक्ट) भंग केल्याप्रकरणी पनवेल येथील न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली असून, शुक्रवारी (दि.२३) त्याची सुनावणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अशाच काहीशा थोड्याफार फरकाने अनुभव घेतलेल्या लेखकांशी संवाद साधला असता त्यांनी लेखकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.

‘उचल्या’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक लक्ष्मण गायकवाड यांच्यासह ‘तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा’ या कादंबरीचे लेखक योगिराज बागुल या दोघांच्या संदर्भात मराठी चित्रपट बनवण्यासाठीच्या हक्कांवरून वाद उभा राहिला होता. आजही बागुल लढा देत आहेत. दोन वर्षांपूर्वीच मराठी चित्रपट तयार करण्यासाठीचे कायमस्वरूपी हक्क आपल्याला विकले असल्याचा दावा दिग्दर्शक समित कक्कड यांनी केला होता. कादंबरीवर लवकरात लवकर चित्रपट बनावा, या हेतूने आपण समित यांना हक्क दिले होते, हे हक्क कायमस्वरूपी नव्हते, तर चित्रपट तयार करण्यासाठी एका वर्षापुरते मर्यादित होते. कराराची कोणतीच प्रत आपल्याला देण्यात आली नाही. समित यांनी केवळ मुहूर्तच केला, पैसे परत करण्याचीची तयारी दाखविली. मात्र समित कराराच्या छायाप्रती दाखवत राहिले. माझ्यासारख्या लेखकाची ही फसवणूकच होती. आपल्या ‘वडारवेदना’ पुस्तकातील ‘दुतखुळा झाली’ या कथेशी मिळतीजुळती कहाणी याची आहे. नागराज मंजुळे याने ही कथा वाचलेली असू शकते. लेखकाला कुठलीच अपेक्षा नाही, पण किमान त्याचे श्रेय तरी त्याला मिळायलाच हवे.
-लक्ष्मण गायकवाड, लेखक

‘तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा’ हे पुस्तक विठाबाईंच्या तमाशामय जीवनाचा पट मांडणारे आहे. या पुस्तकावर आधारित चित्रपटनिर्मिती करण्यासंदर्भात माझा जळगाव येथील दिनेश अगरवाल या निर्मात्याशी करार झाला होता. करार केल्यापासून दोन वर्षांच्या आत चित्रपटाचा पहिला प्रोमो झळकावा, असा स्पष्ट उल्लेख कागदोपत्री होता. निर्मात्याने दोन वर्षांची मुदत न पाळल्यास, पुस्तकाचे सर्व हक्क पुन्हा लेखकाकडे हस्तांतरित होतील, अशी तरतूद होती. दोन वर्षांत चित्रपटाची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. हा करार संपूर्ण दीड-दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही दिग्दर्शक कुंडलिक धुमाळ यांचा चित्रपट काढण्याचा खटाटोप सुरू आहे. याबाबत, मी निर्माता, दिग्दर्शक यांना लेखी नोटीस पाठवली. याबाबत, चित्रपट महामंडळ, सेन्सॉर बोर्डालाही लेखी कळवले आहे. सध्या माझा दुसऱ्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर चित्रपटासंदर्भात करार झाला आहे. असे असतानाही, पहिला दिग्दर्शक लेखी नोटिशीची तमा न बाळगता चित्रपट काढण्याची लगबग करत आहे.
- योगिराज बागुल, लेखक

‘नटरंग’मधील आशयाचा पूर्वीपासून अनेक निर्माते, दिग्दर्शकांना मोह होता. त्यामुळे, अनेकांनी बाबांना ‘आम्हाला या कादंबरीचे हक्क द्या’ अशी विनंती केली होती. मात्र, आशय न बदलता कलाकृती निर्माण व्हावी आणि ती सवंग नसावी, असा त्यांचा आग्रह होता. कादंबरीचे कलाकृतीत रूपांतर करताना त्याचा मूलभूत गाभा बदलू नये, कथानकाचा दर्जा कायम राहावा, असेही आनंद यादव यांचे म्हणणे होते. मुंबईतील एका ग्रुपने कादंबरीवर आधारित वगनाट्य तयार करण्याची परवानगी मागितली. ‘वगनाट्याचा पहिला प्रयोग मला दाखवा, तो पसंत पडल्यास पुढील प्रयोग करा’, अशी त्यांनी अट घातली होती. त्यानुसार, पहिला प्रयोग पाहिल्यावर तो त्यांच्या पसंतीस पडला नाही आणि त्यांनी नकार दिला. काही काळाने, रवी जाधव बाबांना भेटायला आले. ते स्वत: कलावंत असल्याने त्यांना ‘नटरंग’ भावली. त्यांनी बाबांच्या संमतीने पटकथा तयार केली. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर सल्लामसलत केली,सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले. लेखकाच्या साहित्यावर चित्रपटाची निर्मिती होत असताना लेखकाला संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक असते.
- कीर्ती मुळीक, आनंद यादव यांच्या कन्या

Web Title: Yes, the authors are also fatal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.