हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 08:27 PM2024-11-18T20:27:39+5:302024-11-18T20:29:20+5:30
"या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थांबला. यानंतर आता बारामती मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. कारण येथे एकाच पवार कुटुंबातील दोन सदस्य समोरासमोर उभे आहेत. आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली. यावेळी, "एका पत्रात माझ्यावर टीका झाली की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत? अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी. आजीने दिलेल्या सोन्याच्या बांगड्यातून मला ताकद येते. या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी -
सुले म्हणाल्या, "एका पत्रात माझ्यावर टीका झाली की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत? अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी. हो, सुप्रिया सुळे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की, या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत. या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत जिवंत होत्या, त्यांच्या हातात या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर या सहा बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या सहा बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस. माझी ताकद कुठून येते? तर शारदाबाई पवारांच्या या सहा सोन्याच्या बांगड्यातून येते. या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाहीत. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या, रक्ताच्या पैशातून घातलेल्या या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या
"ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची, तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी मला सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून. ज्यांच्यावर मध्यंतरी रेड झाली होती. त्या रजनी इंदुलकर त्यांची आई ज्यांना मी मोठी आई म्हणायची. मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते, तेव्हा तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. साहेब गाडी चालवत होते. मोबाईल नसल्याने दोन दिवस कुणालाच काहीच माहिती मिळाली नाही. माझ्या आजीच्या मानत होतं की, शरद सुरक्षित परत आला, तर मी माळाच्या देवीला जाईन आणि ओटी भरेन. तो दिवस आणि आजचा दिवस, आम्ही जेव्हा जेव्हा बारामतीला येतो, तेव्हा आई आणि मी माळाच्या देवीला जातो," अशी आठवणीही सुळे यांनी यावेळी सांगितली.