होय.. हे खरे आहे.! मान्सून अंदमानात दाखल....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:18 PM2019-05-18T14:18:07+5:302019-05-18T20:17:11+5:30
हवामान विभागाने मान्सून 18- 19 मे ला अंदमान समुद्रात दाखल होईल असा अंदाज जाहीर केला होता, तो खरा ठरला..
पुणे : ज्याच्या आगमनाकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. कडक उन्हाळ्याचा तडाखा बसलेले, दुष्काळाच्या संकटाने प्रत्येक क्षण चिंतेत जगणाऱ्या शेतकरी , पशु प्राणी , यांसह सर्वांना सुखावणारी बातमी म्हणजे मान्सूनचे आगमन.. होय हे खरे आहे.. नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून ) शनिवारी (दि.१८ ) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज मान्सून अंदमानात पोहचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हवामान विभागाने मान्सून 18- 19 मे ला अंदमान समुद्रात दाखल होईल असा अंदाज जाहीर केला होता. तो खरा होऊन आज मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे..
पुणे : दुष्काळ आणि पाणीटंचाईने ज्याच्या आगमनाकडे सर्वांंच्या नजरा लागून राहिल्या आहेत़ त्या मॉन्सूनने आपली पहिली वर्दी दिली आहे़. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट, बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडच्या काही भागात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने शनिवारी (दि. १८) जाहीर केले़.
मान्सून अंदमान, निकोबार बेटांवर १८-१९ तारखेला तो दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने दोन दिवसापूर्वी जाहीर केली होता़ हा अंदाज खरा ठरला आहे़. येत्या ३-४ दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग, उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटावर मॉन्सूनचे आगमन होण्यासाठी अनुकुल हवामान आहे़. गेल्या ४८ तासापासून निकोबार बेटांवर जोरदार पाऊस पडत असून २२ मेपर्यंत या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे़.
दरम्यान महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी असलेली उष्णतेची लाट कायम आहे. येत्या २१ व २२ मे रोजी विदर्भातली उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. गेल्या चोवीस तासातील राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात ४५.८ अंश सेल्सिअस इतकी तर सर्वात कमी तापमान पुणे येथे २०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भासह पश्चिम बंगाल,ओडिशा, झारखंड, बिहार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, तामिळनाडु, उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे़.