हो.... शिवसेना भाजप अन् रिपाइंची महायुती ठरली, जागावाटपही पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 06:43 PM2019-09-30T18:43:43+5:302019-09-30T19:09:48+5:30
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपाची युती झाल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुंबई - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, अजूनही भाजप-शिवसेना युतीतील जागावाटाप बाबतचा निर्णय होऊ शकला नव्हता. कटाप्पाने बाहुबलीला का मारले याच्या उत्तराची जेवढी प्रतिक्षा जनतेला होती, तेवढीत युतीच्या निर्णयाचीही प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला लागून राहिल होती. अखेर, युती होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर हो... असं मिळालं. त्यामुळे युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना, भाजपा , रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुती झाल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर भाजपा आणि शिवसेना राज्यातील किती जागांवर निवडणुका लढवणार याचा फॉर्म्युलाही त्यांनी सांगितला. युतीच्या निर्णयावर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. त्यामुळे युतीची घोषणा होताच बंडखोरी पाहायला मिळणार आहे. पण, यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला होता.
विधानसभा निवडणुकीत युती होणार आहे. मात्र युतीनंतर बंडखोरीची शक्यता बिलकुल नाही. त्याचे कारण असे की, भाजप-शिवसेनेचं संघटन संपर्क मोठा असल्याने नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना समजवण्याची काही व्यवस्था असल्याचे पाटील म्हणाले. तर नाराज होणार हे नैसर्गिक आहे, मात्र ते त्यामुळे बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जातील याची शक्यता नसल्याचा दावाही पाटील यांनी केला. जागावाटप पूर्ण झाला असून लवकरच एका पत्रकाच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख याबाबतची घोषणा करतील, असेही पाटील यांनी म्हटले.