होय, खुल्या अर्थव्यवस्थेचे आम्हीही समर्थक पण... :राजू शेट्टी
By admin | Published: July 9, 2017 06:22 PM2017-07-09T18:22:13+5:302017-07-09T19:02:02+5:30
शेतकरी संघटनेचे नेते स्व़ शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी
रमाकांत पाटील / ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 9 - शेतकरी संघटनेचे नेते स्व़ शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे असल्याने ते होईल तेव्हा होवो पण आज शेतकऱ्यांना स्वाभीमानाने उभे करायचे असेल तर त्याच्या मालाला हमीभावासाठी स्वामिनाथन आयोग लागू झालाच पाहिजे. अशी ठाम भूमिका खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या ६ जुलैपासून मंदसोर, मध्यप्रदेश पासून किसान मुक्तीयात्रा निघाली आहे़ मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमार्गे विविध राज्यातून येत्या १८ जुलैला ही यात्रा दिल्लीला पोहचणार आहे़ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर पहिलीच पिपळीमंडी येथील श्रध्दांजली सभा मध्यप्रदेश सरकारच्या विरोधामुळे नियोजीत स्थळी होऊ शकली नाही़ उलट पोलिसांनी नेत्यांना अटक करुन त्यांच्याच वाहनात या आंदोलकांना यात्रेच्याच मार्गावर २५ किलोमीटर दळोदा येथे नेऊन सोडले़ या संघर्षानंतर महाराष्ट्रात यात्रेचे प्रवेश होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रवी देवांग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या यात्रेला विरोध दर्शविला आहे़ या यात्रेची भूमिका व मागणी म्हणजे, शेतकऱ्यांना पुन्हा पारतंत्र्य नेण्याचाच प्रकार असल्याचा आरोप संबंधित नेत्यांवर करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमिवर रविवारी या किसान मुक्ती यात्रेतील प्रमुख नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले शेतकरी संघटनेचा नेत्यांच्या बुध्दीची किव करावीशी वाटते़ कारण या संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रवी देवांग यांच्याशी काही दिवसांपूर्वीच या यात्रेच्या नियोजनाबाबत बैठक झाली़ त्यात त्यांचाही सहभाग होता़ मग त्यावेळी त्यांना राजू शेट्टी, मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांचा विचारसरणीसंदर्भात माहिती नव्हती का? त्याचवेळी त्यांनी विरोध का दर्शविला नाही़ जेव्हा यात्रा महाराष्ट्रात येते त्याच्या पूर्वसंध्येला ते विरोध दर्शवितात़ खरे तर, आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे़ शेतकऱ्यांना पुन्हा स्वाभीमानाने उभे करण्यासाठी प्रयत्न अपेक्षीत आहेत़ त्यामुळे स्व़ शरद जोशी यांची खुल्या अर्थव्यवस्थे संदर्भातील मागणीला आमचा विरोध नाही़ त्याला आमचेही समर्थन आहे़ पण, ही अर्थव्यवस्था येण्यासाठी अन्नधान्य, जिवनावश्यक वस्तू कायदा कलमच्या १९५५ चा कायद्यात बदल होण्याची गरज आहे़ या शिवाय अन्यही अनेक महत्वाच्या बाबी आहेत़ त्याची तत्काळ अंमलबजावणी शक्य नाही़ ते होईल तेव्हा होवो त्याचेही स्वागतच आहे़ पण आज शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमुक्तीची गरज आहे़ शिवाय, त्याच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून स्वामिनाथन आयोगाने सांगितल्या प्रमाणे उत्पादन खर्चावर दीड पटीने भाव मिळणे गरजेचे आहे़ जर शेतीमालाल भाव मिळाला नाही, तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतील़ त्यामुळे या मागण्या त्वरीत लागू कराव्या यासाठी मंसुरपासून दिल्लीपर्यंतची ही यात्रा आम्ही काढली आहे़
यासंदर्भात दिल्लीला जावून जंतरमंतरवर मंदसोर येथे पोलिसांच्या गोळीबारात मुत्यूमुखी पडलेल्या ६ शेतकऱ्यांचे अस्थिकलश ठेवणार आहोत़ सर्व खासदारांना त्याच ठिकाणी श्रध्दांजलीसाठी आपण बोलावणार आहोत़ जे खासदार येतील ते शेतकऱ्यांचे समर्थक म्हणून त्यांचे स्वागत करु़ जे येणार नाहीत़ त्यांना शेतकरी विरोधक म्हणून शेतकऱ्यांसमोर उघडे पाडू़या संदर्भात संसदेच्या आगामी अधिवेशनातही आपण प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधणार आहोत़