काल शिंदेंनी आमदारांना भोजनाला बोलवलेले, पण रद्द केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:16 PM2023-08-11T12:16:37+5:302023-08-11T12:17:30+5:30
मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. - संजय राऊत
नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव का आणावा लागला? कारण या देशातील एक राज्य गेल्या साडे तीन महिन्यापासून हिंसेच्या वनव्यात पेटलेले आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. मोदी यासंदर्भात संसदेत येऊन निवेदन करण्यास तयार नव्हते. म्हणून अविश्वास ठराव आणावा लागल्याचे ठाकरे गट शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. मोदींनी विक्रमी भाषण केले आणि त्यात केवळ अडीच मिनिटेच मणिपूरवर बोलले, अशी टीका राऊत यांनी केली.
मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते, महागाई, चीनचा धोका यावर शब्द काढला नाही. मणिपूरच्या समस्येला नेहरू जबाबदार आहेत असे ते म्हणतात. आता नेहरूंच्या प्रेमातून बाहेर पडा, दहा वर्ष आपले सरकार आहे, आपण काय केले? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी होते आपण काय केले तेव्हा? पण जसे संताजी धनाजी दिसायचे तसे यांना नेहरू दिसतात. नेहरू हे फार मोठे नेते, त्यांना जगाची मान्यता आहे, तुम्ही सत्ता सोडा, तुम्ही कोणत्या राज्याचा प्रश्न सोडवला? आमच्या बेळगावचा प्रश्न तरी सोडवा, शांतीचा सूर्य कधी उगवेल? तुमचा सूर्य मावळणार आहे, 2024 ला ते बघा, असा इशारा राऊत यांनी दिला.
फ्लाइंग किस काय असते? फ्लाइंग किस म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याचे नवीन पिढीचे ते एक साधन आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिलेले आहेत. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस दिले म्हणजे कोणाचा विनयभंग केले का? त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या, मोदींनी देखील फ्लाइंग किस द्यावा त्यांना कोणी अडवले आहे, असेही खोचकपणे राऊत म्हणाले.
काल मुख्यमंत्री यांनी आपल्या आमदारांसाठी एक जेवण ठेवले होते. पण नंतर ते रद्द झाले. कारण, त्या जेवणामध्ये मारामाऱ्या होतील मंत्री पदावरून म्हणून काल त्यांचे हेलिकॉप्टर देखील उडू शकले नाही, असे राऊत म्हणाले. त्यांच्या बाजूने जनता आणि निसर्ग देखील नाही, हे सर्व औट घटकेचे सरकार आहे. 2024 ला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडियाचे सरकार येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाल? माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना आणि तपास यंत्रणेला देखील सवाल आहे. 2024 ला या सर्व खोट्या तपासण्या चौकशा केसेस या बद्दल तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, कोणालाही दया, माया केली जाणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.