"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:47 AM2024-11-24T11:47:59+5:302024-11-24T11:53:40+5:30
Yevla Assembly Election 2024 Result Live Updates: : येवल्यामधून छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत येवल्यामधून छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला. या विजयानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
गेल्यावर्षी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यापासून जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेकदा शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला छगन भुजबळ यांचा विरोध होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली होती. तसेच येवल्यामधून छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचं आवाहनही केलं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत येवल्यामधून छगन भुजबळ यांनी मोठ्या मताधिक्यासह विजय मिळवला. या विजयानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे. सुफडा साफ करू असे जे म्हणत होते त्यांचाच सुफडा साफ झाला आहे. मला पराभूत करण्यासाठी काही जण रात्री दोन-तीन वाजेपर्यंत इथे फिरत होते. सभा घेत होते. माझ्या सभा असतील तिथे घोषणाबाजी करायचे, फटाके लावायचे. तरी पण एक माणूस हटला नाही. आता इथेच ते यशस्वी झाले नाहीत तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
दरम्यान, येवला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरुद्ध शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे अशी लढत रंगली होती. या लढतीमध्ये छगन भुजबळ यांनी २६ हजार ४०० मतांनी विजय मिळवला. छगन भुजबळ यांना १ लाख ३५ हजार २३ तर माणिकराव शिंदे यांना १ लाख ८ हजार ६२३ मतं मिळाली.