योग ही जगण्याची कला
By Admin | Published: June 19, 2016 12:28 AM2016-06-19T00:28:36+5:302016-06-19T00:28:36+5:30
आयुष्यातील ताणतणाव, नातेसंबंधात येणारा दुरावा, कामाचा ताण अशा चहुबाजूंनी वेढल्यानंतर कोणत्या दिशेने जावे, हे अनेकांना कळत नाही. अनेकदा काहीच साध्य न झाल्याने चुकीचा
आयुष्यातील ताणतणाव, नातेसंबंधात येणारा दुरावा, कामाचा ताण अशा चहुबाजूंनी वेढल्यानंतर कोणत्या दिशेने जावे, हे अनेकांना कळत नाही. अनेकदा काहीच साध्य न झाल्याने चुकीचा मार्ग स्वीकारला जातो. हे सर्व टाळण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे जीवन जगण्याची कला शिकणे. परिपूर्ण विचार करायला लागणे आणि ही कला आत्मसात करण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा ठरतो. २१ जून अर्थात, मंगळवारी असणाऱ्या ‘जागतिक योग’ दिनाच्या पार्श्वभूमीवर योगगुरूहंसाजी जयदेव यांनी ‘लोकमत’च्या कॉफीटेबल उपक्रमांतर्गत संवाद साधला. हंसाजी या जगातील सगळ््यात जुन्या योगा इन्स्टिट्यूटच्या सध्या संचालक आहेत, शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग’ दिनासाठी बनविलेल्या समितीत त्या एकमेव महिला योगगुरू आहेत.
आयुष्यातील योगाचे महत्त्व काय?
आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. कारण या गोष्टींशिवाय जग अपुरे आहे, असा समज बनलेला आहे, पण हे सत्य नाही. पैसा असल्यास कोणतीही गोष्ट खरेदी करता येते, असे अनेकांना वाटते. वास्तव वेगळे आहे. धनवान व्यक्ती झोप, समाधान, शांतता, प्रेम, नाती विकत घेऊ शकत नाही. आयुष्यात आरोग्य, कर्म, कुटुंब, समाज आणि ‘स्व’संवाद या पाच गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे, पण या सर्व गोष्टींपैकी एकाच गोष्टीला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच तणाव वाढतो आणि गोष्टी इथेच चुकतात. भौतिक जगात जगतानाही समाधान, शांतता या गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रत्येकाने योग करणे आवश्यक आहे. योग म्हणजे जगण्याची कला आहे. फक्त एकाच एक गोष्टीचा विचार न करता, परिपूर्ण विचार केला पाहिजे, त्यासाठी योगा महत्त्वाची भूमिका बजावतो.
योगाचा उदय कसा झाला?
माणसे एकत्र राहायला सुरुवात झाली. दु:ख कमी करण्यासाठी त्याने काही गोष्टी सुरू केल्या, त्यातूनच ‘योग’ सुरू झाला. योग ही एक संस्कृती आहे. हटयोग, कर्मयोग, भक्तियोग ही योगाची विविध अंग झाली. पुढच्या काळात पतंजली ऋषींनी सर्व योगांचा अभ्यास करून परिपूर्ण योगसूत्रांचे एकत्रिकरण केले. योगसूत्रांमध्ये आयुष्यातील सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ‘स्व’विषयक जागरूकता निर्माण करणारे विज्ञान
म्हणजे योगा, अशीही योगाची ओळख बनली आहे.
फिटनेससाठी योगा किती फायदेशीर ठरतो?
गेल्या काही वर्षांत जाहिरातबाजीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. योगाचे नवनवीन प्रकार हे याचेच फलित आहे. कारण फिटनेसविषयी जनजागृती झाल्यापासून कोणत्याही प्रकारामागे योगा जोडले जाते. त्यामुळे पॉवरयोगा, सुफीयोगा आदी प्रकार समोर आले. प्रत्यक्षात मात्र, ‘योग’ हा कधीच एकांगी असत नाही. योग म्हणजे परिपूर्ण असा विचार, संस्कार आहे. त्यामुळे सध्या उदयाला येत असलेले एकांगी पॉवर योगा, सुफी योगा किंवा फक्त ध्यानधारणा हे आरोग्यास घातक आहे. अनेकदा व्यक्ती मन:शांतीसाठी केवळ ध्यानधारणा करतात, पण असे केल्यास अनेकांचा मानसिक ताण वाढतो. पाठीची दुखणी मागे लागतात. कारण नुसते प्राणायाम करणे योग्य नाही. शरीरावरील ताण तसाच राहिल्याने त्याचे दुष्परिणामच होतात. एकांगी योगा करणे अयोग्य आहे. योग शिकण्यासाठी परिपूर्ण साधना करणे आवश्यक आहे. सर्वांग योग केला, तरच त्याचा फायदा होऊ शकतो.
हल्ली ओंकार साधना आणि सूर्यनमस्काराला विरोध होताना दिसतो, त्याविषयी तुम्हाला काय वाटते?
योगात धर्म आणणे अयोग्य आहे. योगा हा कोणत्याही धर्माशी निगडित नाही. ही एक आयुष्य जगण्याची कला आहे. ही कला सर्वांनी आत्मसात केल्यास त्याचा फायदा होणार हे नक्की. स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी योगा करणे फायद्याचे आहे, पण ‘जागतिक योगा’ दिनावर होणारे राजकारण चुकीचे आहे. सूर्यनमस्काराला होणाऱ्या विरोधाला काहीच अर्थ नाही. कारण सूर्यनमस्कार हा मुळात योगाचा भाग नाही. तीन ते चार योगासने एकत्र करून सूर्यनमस्कार केले जातात. सूर्यनमस्कारासारखे अनेक कॉम्बिनेशन करता येऊ शकतात. तीन-चार आसने एकत्र करून वेगळा प्रकार नक्कीच निर्माण करता येईल. त्या प्रकाराला एक नाव द्या. त्याचा सराव करा. फायदा तुम्हालाच होणार आहे. ‘ओम’ उच्चारणाला अनेकांचा विरोध आहे. प्रत्यक्षात ओम प्राणायमाच्या भ्रामरी प्रकारात मोडतो. ज्यांना ‘ओम’चे उच्चारण करायचे नाही, त्यांनी दीर्घ श्वास घ्यावा, श्वास सोडताना ‘मकार’ करावा. म्हणजे ओठ बंद करून मधमाशीचा जसा आवाज असतो, तसा करावा. हे तंत्र अत्यंत फायदेशीर ठरते. इतक्या साध्या प्रक्रियेसाठी राजकारण हवे कशाला? हेच मला कळत नाही.
मनावर ताबा मिळवणे योगाद्वारे कसे शक्य आहे?
जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असतो. आजाराने मृत्यू होतो, असे आपण मानतो किंवा आजार हे निमित्त ठरते. जीवनपद्धती अयोग्य असल्यास, त्या व्यक्तीला आजार जडण्याचा धोका अधिक असतो. आपण जन्माला येतो, तेव्हा कुठे, कोणाकडे जन्माला यायचे, याचा पर्याय आपल्याकडे नसतो. मृत्यू कधी होईल, हेदेखील आपल्याला माहीत नसते. मग आपल्या हातात काय असते? तर आपण कसे वागायचे, आपण काय करायचे, कोणत्या गोष्टी करायच्या हे ठरवण्याचे स्वातंत्र असते. हे पर्याय योग्य पद्धतीने निवडल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. तणाव घेऊन कोणतीही गोष्ट सुटत नाही. त्यामुळे तणावाखाली राहून आयुष्य जगणे अयोग्य आहे. आपले कर्म करत राहणे आवश्यक आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. योगाची साधना केल्यास रागावर नियंत्रण येते. त्याचबरोबर, ताण कमी होते. यामुळे आयुष्य अधिक सुकर होते. नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारल्यास येणारी संकटे कमी होतात. या माध्यमातून मनावर ताबा मिळवणे शक्य होते.
ताणतणाव नियंत्रणात कसा ठेवावा?
आयुष्यात स्वत:साठी वेळ काढला पाहिजे. दिवसातून स्वत:साठी दोन ते पाच मिनिटे काढलीच पाहिजे. मन:शांती मिळणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यासाठी साधा सोपा उपाय आहे. मनात कोणाताही विचार न आणता डोळे मिटून शांत बसायचे. हा वेळ स्वत:साठी असल्याने इंद्रियांनी परिसरातील एखादा आवाज, गंध, स्पर्शाचा अनुभव घेऊन बघा. वाऱ्याची अंगावर येणारी झुळूक अनुभवून बघा. लांबून येणारे आवाज ऐका, श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची सवय करा. या सगळ््याचा नक्कीच फायदा होतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, एखादा प्रश्न भेडसावत असतो, त्या वेळी आपण त्याच-त्या गोष्टीचा विचार करत असतो. त्यावर मार्ग काढण्यासाठी त्याच गोष्टी डोक्यात साठवतो, पण अशाने मार्ग निघत नाही. ताण मात्र वाढतो. हे टाळण्यासाठी असा उपाय केला पाहिजे. असे केल्यास डोक आणि शरीरही शांत होते. त्यानंतर, उत्तर शोधण्याचा विचार केल्यास नक्कीच त्याचा फायदा होतो. रोज स्वत:साठी वेळ काढल्यास अनेक सकारात्मक गोष्टींचा अनुभव घेता येतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता स्वत:त असते. त्यामुळे ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
योगाच्या माध्यमातून आयुष्यात समतोल साधता येतो, असे आपण म्हणू शकतो का?
नक्कीच...सध्या कमी-अधिक प्रमाणात ताण आणि आजार यांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडलेला आहे. पाया पक्का असेल, तरच माणूस आयुष्यात स्थिरावू शकतो. योगा केल्यास सर्वच ठिकाणी समतोल साधता येतो. त्यानंतर, कोणत्या योगात पुढे जायचे, हे आपण ठरवल्यास त्याची प्रगती होते, पण पहिल्यांदा शिकताना भक्तियोग अथवा कर्मयोगच शिकलात, त्यातच पुढे गेल्यास आयुष्य अपूर्ण राहते. कारण कुटुंब आणि कर्तव्याला आपण दुय्यम स्थान देऊ लागतो. नकळतपणे याकडे दुर्लक्ष होते. असे झाल्यास आयुष्यात असमतोलता निर्माण होते. सर्वसमावेशक दृष्टी योगातूनच विकसित होऊ शकते.
बैठे काम करणाऱ्यांसाठी काय सांगाल?
कामातून वेळ काढणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बैठ्या कामाच्या शैलीमुळे अनेक आजार जडतात. प्रत्येक काम सुरू असताना थोड्या-थोड्या वेळाने उठून फेरी मारून यावे. सतत संगणकाकडे पाहून काम करताना मधेच लांब पाहावे. त्याचबरोबर, दुपारच्या जेवणाआधी जिने शांतपणे चढून-उतरून आले पाहिजे. जेवणानंतर धावाधाव करू नये. रात्रीचे जेवण आणि झोप यात चार तासांचे अंतर असावे. कारण अन्नाचे पचन व्हायला किमान तितका वेळ लागतो. जेवण झाल्यावर तत्काळ झोपल्यास शरीराला आराम मिळत नाही. सकाळी उठताना एका कुशीला वळून उठले पाहिजे. कारण सरळ पटकन उठल्यास मानेला, पाठीला झटका बसून त्रास संभवू शकतो. अंथरुणात असतानाच हात-पायाच्या हालचाली केल्यास स्नायू मोकळे होतात. सकाळी आठच्या आधी नाश्ता करणे आवश्यक आहे. कारण सूर्याेदयानंतर जठराग्नी सक्रिय होतो. त्यामुळे नाश्ता उपयुक्त ठरते.
अपूर्ण झोपचे दुष्परिणाम कोणते?
अनेक जण रात्री जागतात आणि उशिरा उठतात, हे निसर्गाविरुद्ध आहे. कारण सूर्यास्त झाल्यावर शारीरिक घड्याळ झोपण्याचे संकेत देते. ते झुगारून आपण जागे राहतो. अपूर्ण झोप झाल्यास मनावरचा ताण वाढतो. त्याचा पहिला परिणाम चेतासंस्थेवर होतो. एक दिवस झोप न झाल्यास राग यायला लागतो. माणूस सभ्यतेच्या मर्यादा ओलांडू लागतो. दुसऱ्या दिवशी ही झोप न झाल्यास, तो तणावाखाली जातो. आजूबाजूच्या व्यक्तींविषयी त्याच्या मनातील प्रेमभाव कमी होऊ लागतो. सहकार्याची भावना नष्ट होते. अनेकदा स्क्रिझोफ्रेनियासारखे मानसिक आजार त्यास जडतात. योगामध्ये मात्र, रिलॅक्सेशनचे अनेक प्रकार शिकवले जातात. ते शिकून आपण व्यवस्थित आयुष्य सुखकरपणे जगू शकतो.
दैनंदिन आयुष्यात योगाचा
कशा रितीने फायदा होतो...
कामाचा ताण हा प्रत्येकावर असतो, पण स्वत:साठी वेळ काढला नाही, तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. पस्तीशी-चाळीशीत होणारे हृदयविकार, पंचविशीत होणारा मधुमेह ही याचीच उदाहरणे आहेत. हे टाळण्यासाठी स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी साधे-सोपे उपाय अंगीकारले पाहिजेत. जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजेत. दर दोन तासांनी खाल्ले पाहिजे. चहा, कॉफी अशी उत्तेजक द्रव्ये घेण्यापेक्षा गरम पाण्यात तुळस, गवती चहा, पुदिन्याची पाने घालून पाणी उकळावे. त्यानंतर, त्यात थोडीशी साखर आणि दूध घालून हा उकाळा प्यावा, याचा नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर, ताक पिणेही उपयुक्त ठरते. दुपारी जेवताना एक अथवा दोन ग्लास ताक प्यायले पाहिजे. दुपारी लिंबू सरबत, कोकम सरबत घेतले पाहिजे. रात्रीच्या जेवणाच्या वेळी भाज्यांचे सूप घेणे शक्य असते. द्रवपदार्थांचे सेवन केल्याने शरीर हलके राहते.
(मुलाखत : पूजा दामले)