योग दिनापाठोपाठ आता ‘आयुर्वेद दिन’
By admin | Published: November 10, 2015 02:11 AM2015-11-10T02:11:56+5:302015-11-10T02:11:56+5:30
आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजही वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. ही परंपरा, शास्त्र जगासमोर येण्याची आवश्यकता आहे
मुंबई : आयुर्वेद ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आजही वैद्यांनी ही परंपरा जोपासली आहे. ही परंपरा, शास्त्र जगासमोर येण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आयुष मंत्रालय प्रयत्नशील आहे. आयुर्वेद शास्त्र जगासमोर येण्यासाठी ‘आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात केले.
धनत्रयोदशीचे औचित्य साधून आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते चेंबूर येथे वैद्य किरण पंडित, वैद्य ऊर्मिला पिटकर, वैद्य विनायक डोंगरे, वैद्य दीपनारायण शुक्ला, वैद्य मंगेश पाटील, वैद्य संजय सातपुते या ६ ज्येष्ठ वैद्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आयुर्वेद भारताची जुनी ओळख आहे. पूर्वी आयुर्वेदाचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे. मात्र परकीय आक्रमणांमुळे देशात आयुर्वेदाचा अभ्यास मागे पडत गेला. पण, तरीही काही वैद्यांनी हे शास्त्र जपून ठेवले आणि पुढच्या पिढीला आयुर्वेदाचा वसा दिला. त्यामुळेच आजही आयुर्वेद टिकून आहे. अनेक वैद्य आयुर्वेद पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आयुर्वेदातील पारंपरिक गोष्टींचा अभ्यास नव्याने केला पाहिजे. संशोधन करून वैज्ञानिक पद्धतीने औषधांची मीमांसा केली पाहिजे. आयुर्वेदाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)