शासकीय कार्यालयातही आता योगाचे प्रात्यक्षिक
By admin | Published: June 19, 2015 02:27 AM2015-06-19T02:27:09+5:302015-06-19T02:27:09+5:30
योग दिनाचे आयोजन होणार सर्व कार्यालयात
अकोला- संपूर्ण जगभर २१ जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यातील सर्व शाळांमध्ये या दिवशी योग प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल. त्याचप्रमाणे आता सर्व शासकीय कार्यालयांमध्येही योग प्रात्यक्षिक आयोजित करण्याचा आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना बुधवारी दिला. योगाला ५ हजार वर्षांची परंपरा आहे. आरोग्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येत्या रविवारी, २१ जून रोजी जगभर योग दिन साजरा होत आहे. भारतातही योग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. योगाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टिकोणातून आयोजित या दिनाचे महत्त्व आबालवृद्धांना व्हावे म्हणून शाळांसोबतच शासकीय कार्यालयातही योग दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
*प्रशिक्षणाचे आयोजन
योग दिनाच्या निमित्ताने योग प्रात्यक्षिक सर्व शासकीय कार्यालयात आयोजित करण्याचे निर्देश आहेत. त्या निमित्ताने कर्मचार्यांना योगाचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. योग प्रशिक्षकांची यादी शिक्षण विभागाकडे उपलब्ध असून, त्यांच्या मार्गदर्शनात योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
*राज्यपाल मुंबई, तर मुख्यमंत्री नागपूरला करतील योगा
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे २0 आणि २१ जून रोजी मुंबई येथे राज्यपाल भवनात सकाळी योग दिन साजरा करणार आहेत. मुख्यमंत्री २१ जून रोजी नागपूर येथे आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. योग दिनाच्या आयोजनाची जबाबदारी आयुक्त, जिल्हाधिकार्यांकडे राज्यात २१ जून रोजी सर्व शाळा आणि शासकीय कार्यालयांमध्ये योग दिन साजरा करण्यात येणार आहे. त्याच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी विभागीय पातळीवर विभागीय आयुक्तांकडे तर जिल्हापातळीवर जिल्हाधिकार्यांकडे सोपविण्यात आली आहे.