कारागृहातील बंदींना योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 03:45 AM2016-08-23T03:45:38+5:302016-08-23T03:45:38+5:30
योगच्या माध्यमातून ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे याचे धडे ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींना देण्यात आले.
ठाणे : योगमुळे शरीर स्वस्थ आणि मन शांत राहते. मनाव्यतिरिक्त पचनक्रीया, श्वसनक्रीया आणि उत्सर्जन यांच्यावर योगचा जास्त प्रभाव होतो अशा शब्दांत योगचे महत्त्व विशद करून योगच्या माध्यमातून ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे याचे धडे ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंदींना देण्यात आले.
बुधवारी बंदीं करीता ‘योगाभ्यास व योगाचे महत्त्व’ हा कार्यक्र म पार पडला. योग शिक्षक आनंद एकांत व मोहित उपाध्याय यांनी उपस्थित बंदींना योगचे धडे दिले. हास्यप्रकाराने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी त्यांच्याकडून नमस्ते, गुब्बारा, लस्सी हे हास्यप्रकार करुन घेतले. हसण्याने रक्तपुरवठा होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मनही सकारात्मक राहते. त्यामुळे स्वस्थ शरिरासाठी हसणे महत्त्वाचे आहे. जितका जास्त श्वास बाहेर फेकला जाईल तितका कार्बनडाय आॅक्साईड बाहेर फेकून शरिराला जास्तीत जास्त आॅक्सीजन मिळण्यास मदत होते. यामुळे आॅक्सीजनचे प्रमाण वाढून शांती मिळते. तसेच, आपल्या मनातील निरुत्सहाचे वातावरण दूर होण्यासही मदत होते हे सांगत श्वसनाचे प्रकार दाखविण्यात आले. त्यानंतर पारंपारिक योग आणि अष्टांग योगचे प्रकार बंदींना शिकवण्यात आले. योगमुळे भावनात्मकदृष्ट्या आपले मन संतुलीत राहते. तसेच, शरीरातील सर्व अवयव चांगल्या पद्धतीने कार्य करतात. योगचा सवार्धिक प्रभाव हा मनावर होतो. कारण शरिरासोबत श्वासाचा देखील व्यायाम होतो. योगमुळे आपण दिवसेंदिवस स्वस्थ आणि निरोगी होत जातो असे सांगून प्राणायमचे महत्त्वदेखील यावेळी विशद केले. यावेळी योग शिक्षकांनी उपस्थित बंदींच्या शंकांचे निरसन केले.