कैद्यांना शनिवारपासून योगाचे धडे
By admin | Published: January 12, 2016 03:00 AM2016-01-12T03:00:26+5:302016-01-12T03:00:26+5:30
कैद्यांचा ताण कमी करण्याच्या, तसेच त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्याभरात कारागृहातील कैद्यांना येत्या शनिवारपासून योगाचे
गडचिरोली : कैद्यांचा ताण कमी करण्याच्या, तसेच त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्याभरात कारागृहातील कैद्यांना येत्या शनिवारपासून योगाचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी कारागृह अधीक्षकांनी योग शिक्षकाची नेमणूक करावी, असे पत्र राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच कारागृह अधीक्षकांना पाठविले आहे.
या संदर्भात ५ जानेवारी रोजी पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांशी पुणे येथे महानिरीक्षकांच्या दालनात बैठक झाली. बैठकीत १६ जानेवारीपासून नियमित योग शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. पतंजली योगसमिती व कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरांचे आयोजन राहणार आहे.
कारागृह नियमांचे करावे लागणार पालन
योगशिक्षकांना प्रवेश देताना कारागृहाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासही अधीक्षकांना कळविण्यात आले आहे. योगासने सुरू असताना कारागृह अधीक्षक किंवा त्यांच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष उपस्थित राहावे, कोणत्याही कैैद्याचे किंवा परिसराचे छायाचित्र काढता येणार नाही. आक्षेपार्ह वस्तू कारागृहाच्या मेन गेटवरच जमा कराव्यात, कैद्यांशी अनावश्यक संपर्क टाळावा, आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे.