योगेश बोंबाळेला ‘महान भारत केसरी’चा बहुमान

By admin | Published: February 1, 2017 12:11 AM2017-02-01T00:11:41+5:302017-02-01T00:11:41+5:30

कर्नाटकात महाराष्ट्राचा झेंडा; स्वाती शिंदेने पटकाविला ‘वीरमाता कित्तूर राणी चन्नम्मा केसरी’ पुरस्कार

Yogesh Bongbal has been honored with 'Great India Kesari' | योगेश बोंबाळेला ‘महान भारत केसरी’चा बहुमान

योगेश बोंबाळेला ‘महान भारत केसरी’चा बहुमान

Next

कोल्हापूर : कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हल्ल्याळ येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याने ‘महान भारत केसरी’ पुरस्कार पटकाविला, तर मुरगूडच्या स्वाती शिंदे हिने ‘वीरमाता कित्तूर राणी चन्नम्मा केसरी’ पुरस्कार पटकाविला. पै. योगेश बोंबाळेला २ लाख रुपये व मानाची गदा प्रदान करण्यात आली. स्वाती शिंदेला २५ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली.
कर्नाटकचे उच्चशिक्षणमंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्यावतीने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील पुरुष गटात अंतिम फेरीत पै. योगेश बोंबाळे आणि पै. माउली जमदाडे हे दोघे कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचे मल्ल समोरासमोर आले होते. या लढतीत माउली जमदाडेने आक्रमक खेळ करताना योगेशवर दुहेरी पट काढला; परंतु योगेशने त्यातून सुटका करून घेतली. त्यानंतर संधी मिळताच योगेशने निकाल डावावर माउलीचा आडवा हात धरून त्यास चितपट केले.
पै. योगेश बोंबाळे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मगरवाडी या छोट्याशा गावचा मल्ल असून, तो वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
महिलांच्या अंतिम फेरीत मुरगूडच्या ‘साई’ संचलित कै. सदाशिवराव मंडलिक कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्याच स्वाती शिंदे आणि नंदिनी साळोखे या दोघी आमने-सामने आल्या. या लढतीत पहिल्या फेरीत दोघींनीही दोन-दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत स्वातीने आक्रमक होत हप्ते डावावर ४ गुण वसूल केले. यानंतर नंदिनीने स्वातीला चितपट करण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वातीने त्यातून सावरत नंदिनीला डेंजर झोनमध्ये नेत चितपट केले. स्वाती आणि नंदिनी दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)


फायनलपेक्षा चर्चा
नंदिनी-रेश्माच्या लढतीची
याच स्पर्धेत सेमीफायनलमध्ये कोल्हापूरच्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलाची आंतरराष्ट्रीय मल्ल रेश्मा माने विरुद्ध मुरगूडच्या नंदिनी साळोखे यांच्यात रंगतदार कुस्ती झाली. या कुस्तीत रेश्मा ६ गुण घेऊन नंदिनीपेक्षा एका गुणाने आघाडीवर होती. लढत संपण्यास ४५ सेकंद अवधी उरला असताना नंदिनीने तिचा हुकमी डाव बगलेत हात घालून बैठ्या ढाकेचा पवित्रा घेत स्वातीला चितपट केले व कुस्तीशौकिनांची वाहवा मिळविली.

Web Title: Yogesh Bongbal has been honored with 'Great India Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.