तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:29 IST2025-02-06T14:27:54+5:302025-02-06T14:29:31+5:30

मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले.

Yogesh Panchal, who returned from Tehran Iran, shared his experience ; How a photo led to a crisis? | तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

तेहरानमधून परतलेल्या योगेश पांचाळनं सांगितला थरार; एका फोटोमुळे कसं ओढावलं संकट?

पुणे - मूळचा नांदेड असलेला पुण्यातील इंजिनिअर तरूण योगेश पांचाळ २ महिन्यापूर्वी इराणमध्ये बेपत्ता झाला होता. भारत सरकारच्या प्रयत्नाने २ दिवसापूर्वीच तो मायदेशी परतला. इराण दौऱ्यावर गेलेल्या योगेशवर तिथे नेमकं काय झाले याचा खुलासा त्यांनी केला आहे. एका फोटोमुळे माणूस कसा अडचणीत येऊ शकतो हे योगेशसोबत घडलेल्या प्रकारामुळे सर्वांना कळून येईल. एक फोटो आणि इराणमध्ये ५९ दिवस डिटेक्शन सेंटरला योगेशला राहावे लागले. 

योगेश पांचाळने सांगितले की, इराणची राजधानी तेहरानला ५ दिवसांच्या दौऱ्यासाठी गेलो होतो. तिथे पोहचल्यानंतर मी हॉटेलला चेक इन केले. तिथे फ्रेश होऊन पर्यटनस्थळ असलेल्या मिलाद टॉवरला गेलो. त्याठिकाणी बरेच पर्यटक होते. तिथे मी बरेच व्हिडिओ, फोटो क्लिक केले आणि कुटुंबाला पाठवून दिले. कदाचित तिथे एखादं प्रतिबंधित क्षेत्र असू शकते. माझ्याकडून चुकून फोटो काढले गेले असतील. मी पहिल्यांदाच इराणला गेलो होतो. फोटो काढल्यानंतर मी भारतात माझ्या कुटुंबाला पाठवले. त्यानंतर मी पुन्हा हॉटेलला आलो तिथून पुन्हा १-२ पर्यटक स्थळी गेलो होतो असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या हॉटेलच्या बेडवर आराम करत असताना पोलीस तिथे आले आणि मला पकडले. त्यानंतर मला कारमधून डिटेक्शन सेंटरला घेऊन गेले. माझ्या डोळ्यावर कायम पट्टी बांधलेली असायची. ५९ दिवस मला तिथे ठेवले होते. मला पोलिसांनी हात लावला नाही, कुठलेही टॉर्चर केले नाही. मोठ्या आवाजातही बोलले नाही. सन्मानजनक वागणूक दिली. मला लागणाऱ्या सुविधा दिल्या. त्यांची प्रक्रिया होती. त्यानुसार ते करत होते. प्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मला ५९ दिवसांनी थेट विमानतळावर आणून भारतात पाठवले असं योगेश पांचाळ यांनी सांगितले. 

दरम्यान, हा पूर्ण वेदनादायी काळ होता. माझा कुटुंबाशी कुठलाही संपर्क नव्हता. मी कुठल्या परिस्थितीत आहे, काय घडतंय हे माहिती नव्हते. मलाही कुटुंबाची माहिती मिळत नव्हती. आई आजारी असल्याने तिची खूप काळजी वाटत होती. मला चौकशीत कुठे कुठे गेला, कोणत्या देशात फिरला हे सर्व विचारण्यात आले असंही योगेश पांचाळ यांनी सांगितले.

कुटुंबाला लागली चिंता

५ तारखेला योगेश इराणला गेले, त्यादिवशी आणि दुसऱ्या दिवशी ते कुटुंबाच्या संपर्कात होते. शेवटचा फोन केला तेव्हा ५ मिनिटाने फोन करतो सांगितले आणि ठेवला. त्यानंतर मी मेसेज केले. कॉल केले ते उचलले नाही. त्यानंतर २ दिवसांनी फोन स्विचऑफ झाला. त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. आम्ही  ९ तारखेला दुतावासाला कळवलं. ११ तारखेला रिटर्न फ्लाईट होती त्यामुळे आम्ही वाट पाहिली पण तेव्हाही आले नाहीत त्यामुळे आम्ही मुंबईत आलो आणि भारत सरकारची मदत घेतली अशी माहिती योगेश पांचाळ यांच्या पत्नीने सांगितले. 
 

Web Title: Yogesh Panchal, who returned from Tehran Iran, shared his experience ; How a photo led to a crisis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.