योगिता पारधी सर्वात तरुण विजयी उमेदवार
By Admin | Published: March 7, 2017 02:23 AM2017-03-07T02:23:09+5:302017-03-07T02:23:09+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली
मयूर तांबडे,
पनवेल- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीने सत्ता मिळवत भाजपाला धूळ चारली. या निवडणुकीत पनवेल तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी योगिता पारधी तर पंचायत समितीसाठी स्वप्नील भुजंग, वृषाली अरुण देशेकर हे सर्वात तरुण विजयी उमेदवार ठरले असून तिघेही उमेदवार शेकाप आघाडीचे आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. २३ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल लागला. यासाठी पनवेलमधील साऱ्याच पक्षांकडून तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली होती. पनवेलमधून जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. वावंजे गणातून जिल्हा परिषदेची २१ वर्षीय शेकापची विजयी उमेदवार योगिता पारधी ही सर्वात कमी वयाची उमेदवार ठरली. तर पंचायत समितीमधून पाली देवद गणातून शेकापचे २२ वर्षीय स्वप्नील भुजंग हा तर चिंध्रण गणातून शेकापच्या २२ वर्षीय वृषाली अरु ण देशेकर हे सर्वात तरु ण विजयी उमेदवार ठरले. ही निवडणूक भाजपा व शेकाप आघाडीने प्रतिष्ठेची केली होती.
पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला १० जागा तर भाजपाला ६ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. तर जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत पनवेलमधून शेकाप आघाडीला ६ जागा तर भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. यामुळे शेकाप आघाडीने पनवेलमधून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. वावंजे जिल्हा परिषदेच्या गणातून शेकापच्या योगिता जगन पारधी या २१ वर्षीय महिला विजयी उमेदवाराने भाजपाच्या पार्वती प्रवीण सफरे यांचा पराभव केला. पंचायत समितीच्या पालीदेवद गणातून स्वप्नील किसन भुजंग याने भाजपच्या अमोल शेषराव इंगोले याचा पराभव केला. तर चिंध्रण गणातून शेकापच्या वृषाली अरु ण देशेकर यांनी भाजपाच्या कमला एकनाथ देशेकर यांचा पराभव केला.
>नवीन पनवेलमध्ये निवडणुकीनंतर शेकाप-भाजपामध्ये पोस्टर वॉर सुरु झाले आहे. शहरातील होर्डिंगद्वारे दोन्ही पक्षांचे पोस्टर वॉर सुरू आहे. त्याच पध्दतीने सोशल मीडियावर पोस्ट वॉर रंगले आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांनी टाकलेल्या पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.