"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:19 PM2022-06-17T16:19:47+5:302022-06-17T19:10:22+5:30
"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.''
मुंबई:केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी खाच बाचतीत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
'सैन्यात भरती होणे अतिशय अवघड'
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आजपर्यंत आपण देशात काँट्रॅक्ट किलर्स शब्द ऐकला होता, पण आता नवीन शब्द येतोय, काँट्रॅक्ट सोल्जर्स. सैन्यात भरती होणे अनेकांचे स्वप्न असते. निधड्या छातीचे पोरं सैन्यात जातात. निधड्या छातीने गोळ्या झेलून देशातील बांधवाना सुरक्षित ठेवतात. त्यांची मानसिक आणि शारिरीक अवस्थात सुदृध असते, म्हणून त्यांना सैन्यात जागा मिळते. अतिशय अवघड प्रक्रियेतून हे पोरं जातात आणि त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळते. अशाच पोरांनी भारताचा इतिहास रचलाय."
काँट्रॅक्टवर घेतलेली पोरं काम करतील?
"भारताचे सैनिक पाकिस्तान, चीन, बाँग्लादेश सीमेवर तैनात असतात. हे सैनिक मायनस तापमानात काम करतात. इशान्येकडे असलेल्या घनदाड जंगलातून परदेशी घुसत असतात, तिकहे आपले सैनिक काम करतात. काश्मीरकडे पाकिस्तान, वर अफगाणिस्तान, इशान्येकडे चीन, बांग्लादेश, या देशांच्या सीमा लागल्या आहेत. सीलाँग चीनने ताब्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत काँट्रॅक्टची पोर काम करू शकतील?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
'तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करताय'
यावेळी आव्हाडांनी केंद्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या पोरांना सहा महिन्यात तयार केले जाणार आहे. त्यांना तुम्ही शस्त्र चालवणे शिकवणार, आधुनिक तंत्रज्ञान असलेली हत्यारे चालवायला देणार. एकप्रकारे तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करत आहात. हे कोणाच्या कामी येईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्याप्रकारे गोरक्षक दल काम करते, त्याप्रमाणेच यांना पोरांना कामाला लावले जाईल," असा आरोप त्यांनी केला.
'...तर नोकऱ्या देऊ नका'
"ज्या वयात पोरांनी अभ्यास केला पाहिजे, त्या वयात ही पोर आर्मीतून निवृत्त होणार. चार वर्षानंतर पोरांनी काय करायचं? देशातील तरुणांची चेष्टा करू नका. नोकरी देता येत नसेल, तर देऊ नका पण बेरोजगारांची टिंगल थांबवा. या योजनेमुळे मुलांचे भविष्यच राहिले नाही. केंद्राला आता सैन्य आता ओझ वाटायला लागलंय," असंही ते म्हणाले.