तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 07:07 PM2024-05-16T19:07:05+5:302024-05-16T19:10:06+5:30
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Chhagan Bhujbal ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र आता महायुतीच्या दोन नेत्यांमध्येही राजकीय कलगीतुरा रंगला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही कसे बसला होता, असा सवाल एका सभेतून राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला होता. राज यांच्या या वक्तव्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, "हा प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारला पाहिजे की, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असं तुम्ही म्हणता. मग तरीही तुम्ही भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कसे काय बसला आहात? माझ्याबद्दल ही सगळी मंडळी बोलतात, पण मी तरी एक शिवसैनिक असेल, कदाचित फार कट्टर नाही, असंही समजून चला. अरे पण तुम्ही तर रक्ताचे आहात ना?" असा खोचक सवाल भुजबळांनी विचारला आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ बोलत होते.
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, "राज शाळेतून आला नाही, म्हणून अनेकदा मातोश्रीवरील लोक जेवत नव्हते. असं असताना तुम्ही का केलं असं बाळासाहेबांसोबत? तुम्ही तर इकडे पण असता तिकडे पण असता. चला जाऊद्या, माझ्यादृष्टीने हा मुद्दा संपला आहे, कारण लोकांनाही हा मुद्दा फारसा भावला, असं काही नाही. मी जसं उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसलो होतो, तसं आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबरही बसलो आहे," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी दिलेल्या या उत्तरानंतर राज ठाकरे यांच्याकडून त्यावर काही भाष्य केलं जातं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.