महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे - राज्यपाल
By admin | Published: February 5, 2016 03:47 AM2016-02-05T03:47:51+5:302016-02-05T03:47:51+5:30
महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत २५पैकी १७ वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला
मुंबई : महाराष्ट्र एनसीसीने आतापर्यंत २५पैकी १७ वेळा पंतप्रधानांचे मानाचे निशाण पटकावले असून, देशातील सर्वोत्तम एनसीसी संचालनालय म्हणून महाराष्ट्राचा लौकिक वाढवला. त्यामुळे आपला आम्हाला अभिमान आहे; महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे व देशालाही अभिमान आहे, अशा शब्दांत राज्यपालांनी एनसीसी कॅडेट्सचे कौतुक केले.
नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिर व परेडमध्ये सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र एनसीसीच्या संपूर्ण चमूला राजभवनावर बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. एनसीसीमध्ये राष्ट्रभक्ती व शिस्त हे गुण बाणविले जातात. त्यामुळे एकदा एनसीसी कॅडेट राहिलेल्या विद्यार्थ्याने हे गुण आयुष्यभर जोपासले पाहिजेत, असे राज्यपालांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. युवकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे तसेच आपण निवडलेल्या क्षेत्रामधे नेतृत्व करावे, असे राज्यपाल या वेळी म्हणाले. यंदा महाराष्ट्रातील ७७ मुले व ३७ मुली यांच्या चमूने प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये भाग घेतला होता. कवायत स्पर्धा (वरिष्ठ गट), बॅले स्पर्धा व मोस्ट एंटरप्रायझिंग नेव्हल युनिट या प्रकारांत कॅडेट्सनी सर्वोत्तम कामगिरी केली; तसेच राज्याच्या १५ मुलांनी व १० मुलींनी प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या संचलनात भाग घेतल्याचे लेफ्टनंट जनरल गिल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)