तू आलास!

By admin | Published: June 19, 2016 12:24 AM2016-06-19T00:24:40+5:302016-06-19T00:24:40+5:30

भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो.

You came! | तू आलास!

तू आलास!

Next

- सुधीर महाजन

भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो. तू निघाला; पण गोव्याजवळ पश्चिम घाटाचा चढ तू चढलाच नाहीस. पुन्हा एकदा मनात मळभ दाटलं, वाटलं, असाच चकवा देणार का? आता नक्की येणार असे हाकारे, डांगोरे पिटले गेले आणि आस लागली. काल दिवसभर तुझा कुठे मागमूसही दिसत नव्हता. सूर्यनारायण तळपत होते. रात्री तर चंद्राने खळे केले. पुन्हा शंकेच्या पालीने डोके वर काढले. तू आला नाही तर अशी भीती मनाच्या कोपऱ्यात होतीच. विजांचे ढोल-ताशे नाही की, वाऱ्याचे घुमणे नाही, भल्या पहाटे तू आला न् अलगद ओसरीवर कोणी येऊन बसावे असा सहजपणे. उन्हात तळपून कोळपलेली झाडं-झुडपं अधाशासारखी तुला अंगावर घेत होती. तापलेल्या मातीचं फूल उमललं आणि मृदगंध पसरला. तू साखर झोप चाळवली; पण तुझ्या येण्यामुळे सारखेचा गोडवा अजूनही तोंडात नव्हे तर आसमंतात पसरला त्याचे काय मोल? तू ताल धरला तो अर्धा पाऊण तास. त्यातच तुझ्याशी बोलायला आतुर झालो. कारण गेल्या तीन वर्षांत तू आमच्याशी का अबोला धरला? तू कट्टी घेतो; पण आमचा जीव जातो. तुझे रुसवे-फुगवे आम्हाला आयुष्यातून उठवतात. गेल्या सात-आठ महिन्यांत आमची काय दैना झाली. तुझ्या शोधात आकाश-पाताळ एक करताना विहिरीत पडून किती जणांना जीव गमवावा लागला. न्हात्याधुत्या बोहोल्यावर चढायची स्वप्न रंगविणाऱ्या किती लेकी-बाळींचा खोल विहिरींनी घास घेतला. कर्ती पोर गेल्याने माय-बाप हबकून गेले. पोरांप्रमाणे जपलेल्या जित्राबांना अनेकांनी बाजार दाखविला, तो खुशीने नव्हे. दावणी मोकळ्या होत गेल्या आणि शेतीचा बारदाना उजाड झाला. जनावरानं बाजाराचा रस्ता धरला की, घरावर मरणकळा उतरते हे तुला माहीत नसावं. तुझ रुसणं एवढ्यावरच थांबलं नाही. घरंच्या घरं देशोधडीला लागली. गावातून मुळासकट उपटली गेली आणि शहरात रुजायची लढाई लढू लागली. ती रुजणार नाही तर आयुष्यभर, उपऱ्याचं जिणं नशिबी आलं. या उपरेपणाचं दु:ख भोगणं म्हणजे वनवास. बैल बारदाना गेला, शेतीचा पट उधळला आणि असं वनवाशाचं जिणं अनेकांच्या नशिबी आलं, गाव सुटलं त्या सोबतीने नात्याचे बंध तुटले आणि असे अनेक सैरभैर झाले, ते आयुष्यभरासाठी. नात्याचे हे बळकट बंधच माणसाला संकटात सावरतात, ते तुटल्यानंतर वावटळीत अडकल्याची अवस्था येते. हे रडगाणं सांगू तेवढं कमीच आहे. तू ऐकणार असशील तर सांगण्यात काही अर्थ आहे, म्हणून म्हणतो, तुझा अबोला आम्हाला परवडणारा नाही. तू काय सैराटासारखा इथे नाही तर तिथे फिरतोस. आम्ही मातीशी बांधले गेलो, तू आलास तर या मातीच्या चिखलात घट्ट पाय रोवण्याची आमच्यात धमक आहे. आम्हाला तुझ्या मागे फिरता येत नाही. कोण अलेक्झांडर फे्रटर नावाचा माणूस त्याने तुझा केरळातून चेरापुंजीपर्यंत पाठलाग केला आणि तुझे राजस, तामस, नखरे पाहिले. तुझं हसवणं, रडवणं शब्दबद्ध केलं; पण तुझा लहरी स्वभाव त्यालाही कळला नाही. तो तुझ्या मागेमागेच फिरत राहिला.
किती जणांनी नजरांचे गालिचे तुझ्यासाठी अंथरले होते. तू आलास तर जरा आल्यासारखा राहा. बऱ्याच दिवसांनी घरी आला. सुख-दु:खाच्या गोष्टी करता येतील. तुला काय सांगू न् काय नको असं झालंय. तुझ्या शिडकाव्याने ते जिरतील, अंगाची, मनाची आणि मातीची तलखी थांबेल. यापेक्षा आणखी काय मागू?

Web Title: You came!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.