सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 01:43 AM2016-12-29T01:43:37+5:302016-12-29T01:43:37+5:30
नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या
मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयाचा प्रचंड त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. पंतप्रधानांनी मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली तरी परिस्थिती बदलेली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी या सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला.
टिळक भवन येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून काँग्रेस पक्षाचा १३२ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून देशाच्या प्रगतीची अनेक कामे केली आहेत. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक, महिला, नोकरदार सर्वांचेच हाल सुरु आहेत. शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्जनता कमालीची त्रस्त आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधातील लढा तीव्र करावा,असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)