तुम बिलकुल हम जैसे निकले!
By admin | Published: October 18, 2015 02:26 AM2015-10-18T02:26:00+5:302015-10-18T02:26:00+5:30
लेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत
- मेघना ढोके, नाशिक
लेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत आपापले पुरस्कार परत करणारे बुद्धिवादी लेखक-विचारवंत, त्यासंदर्भातही होणारे वाद-प्रतिवाद असा अस्वस्थ माहौल देशात खदखदत असताना सरहदपारहून एक बंडखोर लेखिका सांगतेय की, विखाराचा खातमा विखारानं नाही होऊ शकत, त्यासाठी शांतता आणि सौहार्दाची भूमिकाच घ्या; आणि जी चूक शेजारी पाकिस्ताननं केली, ती चूक ‘देश आणि समाज’ म्हणून तुम्ही करू नका! फहमिदा रियाज त्यांचं नाव. ‘तुम बिलकुल हम जैसे निकले’ असं म्हणणारी आणि पाकिस्तानातल्या धर्मवेड्यांच्या चुकांचा पाढा वाचत भारतीय जनतेला सावध राहा म्हणणारी त्यांची कविता सोशल नेटवर्किंग साईट्सवर फॉरवर्डच्या चक्रात सध्या लोकप्रिय झाली आहे.
त्यांच्याशी थेट पाकिस्तानात कराचीला संपर्क साधला. तेव्हा ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, धार्मिक उन्मादाचा रस्ता जगणं खाक करून माणसांना जिवंतपणी नरकयातना कशा देतो याचं ढळढळीत उदाहरण असलेला देश तुमच्या शेजारी आहे, आमच्याकडे पाहा, आम्ही केली ती चूक तुम्ही करू नका!’
ज्येष्ठ पाकिस्तानी कवी, लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून फहमिदा रियाज यांचं उर्दू साहित्यात मोठं नाव आहे. आपल्या लेखन आणि विचारस्वातंत्र्यांसाठी त्यांनी पाकिस्तानात अनंत यातना सोसल्या. जनरल झिया उल हक यांच्या कारकिर्दीत तर त्यांना आपल्या लेखनशैलीमुळे थेट तुरुंगवास भोगावा लागला. पाकिस्तानात जगणं दुश्वार झालं म्हणून स्वत:च्याच देशातून हद्दपार होत भारतात आश्रय घ्यावा लागला. १९८१ ते १९८७ या काळात त्या भारतात राहत होत्या आणि भारत सरकारनं त्यांना आसरा दिला होता. आपल्या लेखनासाठी हद्दपार होणं पत्करलेल्या फहमिदा रियाज यांचं म्हणणंच आहे की, लेखनस्वातंत्र्य फुकट मिळत नाही. लेखकाला आपल्या शब्दाची किंमत मोजावीच लागते. ती मोजली तर लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. कथनी आणि करणीत अंतर दिसलं तर लोकांनी तरी काय म्हणून बुद्धिवाद्यांवर विश्वास ठेवावा?
आपल्या परखड विचारांची जबर किंमत मोजलेल्या फहमिदा रियाज यांच्याशी झालेल्या संवादाचा विशेष वृत्तांत आजच्या मंथनमधे!