अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात
By admin | Published: March 18, 2016 04:53 PM2016-03-18T16:53:08+5:302016-03-18T16:53:08+5:30
राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राचा विकास दर उणे 2.7 टक्के असताना राज्य पुढे कसे जाणार अशी विचारणा त्यांनी केली.
थोरात म्हणाले,‘राज्य सरकारने बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली हे महत्वाचे नाही. तुम्ही जी तरतूद करता त्यातील एक एक रुपया त्या क्षेत्रासाठी किती प्रामाणिकपणे खर्च होणार हे जास्त महत्वाचे आहे. मला नुसते आकडे आणि तरतूदी नकोत. त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. आज मराठवाडा,विदर्भात माणसे व जनावरेही पाण्यावाचून मरत आहेत. त्यांना पहिल्यांदा प्यायला पाणी द्या. त्याला जगविण्यासाठी तुम्ही ‘वॉर फुटिंग’वर काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. कारण माणूसच जगला नाही तर त्याचा स्वाभिमान कसा जागृत करणार याचा विचार व्हावा. जो शेतकरी आज मरायला लागला आहे, त्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. जो श्रीमंत आहे, त्याला तुमच्या मदतीची गरज नाही. परंतू जो मधला शेतकरी आहे, त्याच्यासाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवताना तोंडाला फेस येतो. म्हणून शेतीतील जाणत्या लोकांची मदत घेवून ज्या तरतूदी तुम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, त्या खरेच त्यांच्यार्पयत पोहोचल्या का याचा आढावा घेतला गेला पाहिजे. असे सामाजिक लेखापरीक्षण झाल्याशिवाय नुसत्या तरतूदी काय कामाच्या नाहीत.’