तुमचा व्हीप चालणार असे म्हणताय, पण तुमच्याकडे माणसे आहेतच किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 02:49 PM2023-05-11T14:49:06+5:302023-05-11T15:13:38+5:30
अनेक लोक घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांनाच कालबाह्य केले आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही. हे मी नेहमी सांगतो. आम्ही जे सरकार स्थापन केले ते कायद्याच्या चौकटीत बसून केले. आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आह, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अनेक लोक घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार असे म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांनाच कालबाह्य केले आहे. कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही सर्वांनीच स्वागत केले आहे. अपात्रतेचा अधिकार हा अध्यक्षांनाच आहे, त्यांच्याकडेच यावा अशी आमची मागणी होती. न्यायालयाने तेच केलेय, असे शिंदे म्हणाले.
निवडणुक आयोगावर माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमने कोर्टात प्रकरण असताना ते कसे काय निर्णय घेऊ शकतात असा आक्षेप घेतला होता. आयोगाने पक्ष चिन्ह आम्हाला दिले. न्यायालयाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे भाष्य केले आहे. जो निर्णय घेतला तो बहुमताचा होता. त्यानंतर आयोगानेही निर्णय दिला. दोन्ही पक्ष आम्हीच होतो हे मी आता म्हणू शकतो. अध्यक्षांकडे निर्णय दिलेला आहे. ते त्यांच्या अधिकारात निर्णय घेतील, असे शिंदे यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्र्यांनी तेव्हा राजीनामा दिला. नैतिकतेचे कारण देऊन सांगताहेत. त्यांना माहिती होते, त्यांच्याकडे बहुमत नाहीय. अल्पमतात आलेले सरकार आहे. राज्यपालांच्या विषयावर बोलू इच्छित नाही. राज्यपालांनाच काय तुम्हाला सर्वांनाच माहिती होते, ते अल्पमतात आलेय. यामुळे राज्यपालांनी त्यांच्या अधिकारात निर्णय घेतला. हेडकाऊंट झाला त्याचे तुम्हा साक्षीदार आहात. नैतिकतेच्या ज्या गोष्टी सुरु झाल्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीला जनतेने बहुमत दिले होते. लोकांना हवे होते ते केले. भाजपासोबत निवडणूक लढविली आणि सत्तेच्या खूर्चीसाठी दुसऱ्यांसोबत गेले, यामुळे नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले, बाळासाहेबांचा पक्ष वाचविला, तुम्ही गहाण ठेवला होता, असा आरोप शिंदे यांनी केला.
१६ आमदारांच्या अपात्रतेवर तुमचा व्हीप चालणार असे म्हणत आहात. पण तुमच्याकडे माणसे किती आहेत, असा सवाल शिंदे यांनी केला.