'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:21 IST2024-12-05T13:19:33+5:302024-12-05T13:21:15+5:30
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली?

'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा?
Eknath Shinde Maharashtra News: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबद्दलचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी बुधवारी (४ डिसेंबर) रात्री भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माहिती दिली.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दीपक केसरकर यांनी शिंदेंसोबतची भेट आणि सरकार स्थापनेबद्दल सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदेंकडून अजूनही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. दीपक केसरकर म्हणाले, "बघा याची घोषणा करणे त्यांचा अधिकार आहे. आम्ही सगळे आमदार त्यांना काल (४ डिसेंबर) रात्री भेटलो. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, 'तुम्ही सरकारमध्ये यायला पाहिजे. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. आम्ही सगळ्यांचे हेच म्हणणे आहे की तुम्ही नसाल, तर आम्ही कोणीही सरकारमध्ये नसू.' त्यांनी याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले आहे."
शिंदे मोदी आणि अमित शाहांचं ऐकतात -केसरकर
दीपक केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे मोदीजी आणि अमित शाह यांचं ऐकतात. त्यांच्याकडून मेसेज आला, तर यात कोणतेही दुमत नाही की, त्यांचे (मोदी-शाह) म्हणणे ते (एकनाथ शिंदे) टाळतील. जसे त्यांचा शपथविधी होता आणि दिल्लीतून फडणवीसांना फोन आला की, तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. तर त्यांनीही ते मान्य केलं होतं. तीच परिस्थिती आहे, भलेही आमचे पक्ष वेगळे असतील. आमची तत्वे एक आहेत. आमचा विचार एक आहे. त्यामुळे आमच्यासाठीही मोदीजी आणि अमित शाह हे नेते आहेत", असे दीपक केसरकर म्हणाले.
"माझ्याकडे अधिकृत माहिती नाहीये. पण, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार काही काळाने होईल. अधिवेशनाआधी व्हायला पाहिजे. कारण त्याची गरज पडते. आपल्याकडे दोन सभागृह आहेत. त्यामुळे पहिला विस्तार अधिवेशनापूर्वी होईल", असे दीपक केसरकर म्हणाले.