शासनासोबत काम करण्याची तरुण उद्योजकांना मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 07:18 AM2022-10-11T07:18:34+5:302022-10-11T07:18:40+5:30

राज्यात स्टार्टअप सप्ताहाला सुरुवात

Young entrepreneurs will get an opportunity to work with the government | शासनासोबत काम करण्याची तरुण उद्योजकांना मिळणार संधी

शासनासोबत काम करण्याची तरुण उद्योजकांना मिळणार संधी

Next



लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सप्ताहासाठी देशभरातून हजारहून अधिक स्टार्टअप्सनी अर्ज केले होते. त्यातील निवडक १०० स्टार्टअप्सना तज्ज्ञ, उद्योजक आणि अधिकाऱ्यांसमोर ऑनलाइन सादरीकरणाची संधी मिळणार आहे. त्यातील उत्कृष्ट २४ स्टार्टअप्सना राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी या स्टार्टअप्सना प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. विजेत्यांना १७ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध विभागांत नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञान यांचा अवलंब करण्यासाठी स्टार्टअप सप्ताहाचा व्यापक उपयोग होतो. देशभरातील कल्पक युवक हे शासनाच्या विविध सेवा, अभियान तथा योजनांमध्ये कल्पक बदल आणण्यासाठी स्टार्टअप्स सादर करतात. या उपक्रमातून कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ ऊर्जा इत्यादी), स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयांतील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना शासनाच्या विविध विभागांत काम करण्यासाठी कार्यादेश देण्यात येतील. या स्टार्टअप सप्ताहाच्या माध्यमातून युवकांमधील नवसंकल्पनांना चालना मिळण्याबरोबरच शासनामध्येही विविध कल्पक प्रयोग राबविता येतील.
 - मनीषा वर्मा, प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग

Web Title: Young entrepreneurs will get an opportunity to work with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.