युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 02:47 PM2024-03-13T14:47:30+5:302024-03-13T14:48:39+5:30
लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहेत. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी, देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे. सध्या १०० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लवकरच १००० महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहेत. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांना 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' असे नाव देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
'मेघदूत' या शासकीय निवासस्थानी, कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील १०० महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यावेळी उपस्थित होते. दृकश्राव्य प्रणालीद्वारे १०० महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे. हे धोरण राबवल्यामुळे देशात आमूलाग्र बदल घडतील. देशात प्रथम स्थानी येऊन आपली अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी मानव संसाधन विकासावर भर देण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ही गोष्ट अत्यंत आनंदाची आहे. अंतरिम अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर त्याची तातडीने अंमलबजावणी करून महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु केल्याबद्दल या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे त्यांनी अभिनंदन केले.
बदलते तंत्रज्ञान आणि जागतिक पातळीवर कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन युवक आणि युवतींना काळाशी सुसंगत असे आवश्यक कौशल्य प्रशिक्षण या केंद्रातून देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घ्यावा. कोणत्याही विषयाची पदवी प्राप्त करून चालणार नाही तर त्यासोबत विविध कौशल्य प्राप्त केले तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले.