Young Global Leaders : यंग ग्लोबल लिडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, भारतातील केवळ 6 नेत्यांनाच मिळालं स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:50 AM2023-03-15T10:50:14+5:302023-03-15T10:51:59+5:30
या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ 100 तरुणांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक, असे दोन गट निर्माण झाले. यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या पारड्यात टाकले. या संपूर्ण घटनेमुळे ठाकरे कुटुंबावर मोठ्या राजकीय संघर्षाची वेळ आली आहे. यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) या वर्षासाठी जगातील 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांच्या यादीची घोषणा केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, हे लोक संवादात सक्षम आर्टिफिशल इंटेलिजन्स ते आर्थिक समावेशापर्यंत विविध कामांमध्ये सामील आहेत. आणि अशा गटात येतात, ज्याचे सदस्य पुढे चालून नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्राचे प्रमुख, फॉर्च्युन 500 कंपन्यांचे सीईओ आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते होऊ शकतात.
या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ 100 तरुणांची निवड करण्यात आली आहे. यात राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, मोठ्या परिवर्तनात्मक संशोधनाशी संबंधित, भविष्याचा विचार करणारे कार्यकर्ते आणि आपला समुदाय, देश आणि जगात सकारात्मक तथा दीर्घकालीन बदलांना गती देत आहेत, अशा तरुणांचा समावेश आहे. तरुण जागतीक नेत्यांची यादी 2004 पासून तयार केली जाते. यात 120 देशांतील 1,400 सदस्यांचा समावेश आहे.
या यादीत आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त, भारतातील केवळ पाच लोकांचाच समावेश झाला आहे. यात भाजपच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई, टीवीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीजचे सीईओ आकृत वैश, बायोजीनचे सीईओ बी जोसेफ आणि पॉलिसी 4.0 रिसर्च फाउंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.