तरुण आमदार जातीपातीमुक्त नवा महाराष्ट्र घडवतील -आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 06:11 AM2020-01-18T06:11:48+5:302020-01-18T06:12:14+5:30
महाराष्ट्राच्या सामाजिक फाळणीचा प्रयत्न
संगमनेर (जि.अहमदनगर) : महाराष्ट्राचे चार तुकडे व चार राज्ये होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. आधी राज्याची फाळणी आणि नंतर सामाजिक फाळणीचा हा प्रयत्न होत आहे. मात्र तरुण आमदारांच्या पिढीला जातीपातीमुक्त महाराष्ट्र घडवायचा आहे, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला़
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्या संकल्पनेतून संगमनेरातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत मेधा २०२० युवा सांस्कृतिक महोत्सवाचे शुक्रवारी (दि़१७) आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे बोलत होते़ कार्यक्रमात उद्योग, खाण राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील हे युवा आमदार सहभागी झाले होते़
ठाकरे म्हणाले, आजोबा स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यात कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्यामुळे अनेक सर्वसामान्यांना मुख्यमंत्री, मंत्री, महापौर ते आमदार होण्याची संधी मिळाली़ महाविकास आघाडी सरकारमधील सर्व तरुण आमदार नव्या विचारांची पेरणी करू पाहत आहेत, असे ते म्हणाले़ रोहित पवार म्हणाले, विकासात मागे पडलेला कर्जत-जामखेड मतदारसंघ आपण निवडला. या मतदारसंघात विकासाचे असे मॉडेल तयार करेल की भविष्यात कुणीही आपल्यावर घराणेशाहीचा आरोप करणार नाही़ तर महिलांना त्यांचीच खाती मिळतात हा समज महाविकास आघाडी सरकारने खोटा ठरविला. राज्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण करणार असून मंत्रिपदाच्या माध्यमातून विकासाचे काम उभे करणार आहे, असे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
धीरज देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना चिंतामुक्त व मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परदेशात उच्च शिक्षण घेतले असले तरी शेती व मातीशी नाळ जोडलेली असल्याने पुन्हा जनतेच्या सेवेत आलो, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले़
आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले, जिथे मातोश्री आहे त्याच मतदारसंघातून विजयी झालो. दोन कॅबिनेटमंत्री मतदारसंघात आहेत. त्यामुळे कामाला अधिक चालना मिळेल.
प्रारंभी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रास्तविकात याच तरुण आमदारांमधून भविष्यात महाराष्ट्राला मुख्यमंत्री व मंत्री मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.
‘पवार ठरवतील तेच होईल’
मुख्यमंत्री म्हणून अजित पवार व सुप्रिया सुळे यापैैकी कुणाला पसंती द्याल या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी शरद पवार ठरवतील तोच निर्णय मान्य होईल, असे सांगताच राज्यातील अहंकारी विचारांचा आम्ही पराभव केला आहे, असे ते म्हणाले़
अन् आदित्य ठाकरे लाजले!
कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी लग्नाच्या विषयावर छेडताच मंत्री आदित्य ठाकरे लाजले. आई रश्मी यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय सोपविल्याचे ते म्हणाले. याच प्रश्नावर मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे सांगितले़