नेपाळचा तरुण अखेर परतला घरी
By admin | Published: June 28, 2016 02:49 AM2016-06-28T02:49:14+5:302016-06-28T02:49:14+5:30
घरात भांडणे करून तो थेट मुंबईत निघून आला. कुठे जातो ते घरात कुणालाच सांगितले नाही.
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- घरात भांडणे करून तो थेट मुंबईत निघून आला. कुठे जातो ते घरात कुणालाच सांगितले नाही. गावातील केवळ एका नातलगाला आपण मुंबईला पोटापाण्याकरिता जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, सायकोसीस आजाराने ग्रस्त असलेला तो थेट प्रादेशिक मनोरुग्णालयातच पोहोचला. मात्र, आता त्याचा आजार नियंत्रणात आल्याने त्याची नेपाळला घरवापसी करण्यात आली.
ठाण्यातील जांभळीनाका येथे लोकांना शिवीगाळ करताना, गाड्यांवर दगडफेक करताना पोलिसांना तो आढळला होता. परंतु, काम शोधण्याकरिता तो ठाण्यात कसा आला आणि ठाण्यातून रुग्णालयात कसा आला, हे मात्र अजूनही त्याला आठवत नाही. सोमवारी रुग्णालयातून त्याला घरी नेण्याकरिता त्याचे आईवडील आले होते. ही कथा आहे नेपाळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाची.
नेपाळच्या एका छोट्या गावात हा इसम राहत आहे. त्याचे आईवडील, दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत हे कुटुंब जगत आहे. घरातील कर्ता न सांगता निघून गेला आणि जेव्हा त्याचा ठावठिकाणा लागला, तेव्हा तो मनोरुग्णालयात आहे, असे समजल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, दुसरीकडे त्याला भेटण्याची आसही होती. रुग्णालयाकडून त्याला नेण्यासाठी काही दिवसांनी या, असे सांगितले असले तरीदेखील त्याचा मुलगा वडिलांना भेटण्यासाठी हट्ट करीत होता. त्याने तर अन्नपाणीच सोडले होते. त्यामुळे या इसमाच्या आईवडिलांनी रुग्णालय गाठले. सोमवारी त्यांनी आपल्या मुलाला रुग्णालयातून घरी नेले. १५ मे रोजी ठाणेनगर पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करून त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा केसरकर या त्याच्यावर उपचार करीत होत्या. सुरुवातीला त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला धड काहीच सांगता येत नव्हते. हळूहळू त्याने नाव सांगितले. मात्र, घरचा पत्ता द्यायला तयार नव्हता. घरच्यांना बोलवू नका, असे तो सतत सांगत होता. १५ दिवसांपूर्वी त्याने पूर्ण पत्ता दिला.
तीन महिन्यांपूर्वी नेपाळहून तो गोरेगाव येथील फिल्म सिटी येथे पेंटर म्हणून काम करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत आला होता. याव्यतिरिक्त तो काहीही सांगू शकत नाही. पत्ता समजल्यावर रुग्णालयाने तेथील स्थानिक पोलिसांना फोन करून त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याचदिवशी पोलीस त्याच्या घरी गेले व तो सापडल्याचे सांगितले.
>मुलाला पाहताच आईच्या आनंदाला पारावार उरला नाही
वडिलांना भेटायला उतावीळ असलेल्या त्याच्या मुलाचा फोन केसरकर यांच्या मोबाइलवर आला. त्या मुलाने माझे वडील तुमच्याकडे आहेत का, अशी विचारणा केली. वडिलांचा शोध लागल्यावर त्यांना भेटायचेच, असा धोशाच लावला. तब्बल चार दिवस त्यांनी प्रवास केला. खिशात पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी या प्रवासादरम्यान काहीही खाल्ले नाही. त्यांच्याकडे धड छत्रीही नव्हती. मुलाला पाहताच त्याच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. त्याला १० ते १२ वर्षांपूर्वीही असाच आजार झाला होता. त्यावेळी तो कुटुंबाला मारहाण, शिवीगाळ करायचा. मात्र, आता तो बरा झाला असून त्याच्या कुटुंबीयांना औषधे सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे केसरकरांनी सांगितले.