पुण्यातील तरुणांकडून अमेरिकनांना गंडा
By admin | Published: February 9, 2016 04:48 AM2016-02-09T04:48:40+5:302016-02-09T04:48:40+5:30
संगणकामध्ये व्हायरस असल्याचे सांगून तो काढून देण्याच्या बहाण्याने लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. हा बीपीओ चालविणाऱ्या
पुणे : संगणकामध्ये व्हायरस असल्याचे सांगून तो काढून देण्याच्या बहाण्याने लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. हा बीपीओ चालविणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन), हरीश नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, वाघेरा कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी अमेरिकेतील ५ ते १० लाख नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. बावधन येथील कोलते-पाटील प्लाझामध्ये असेलल्या आयस्पेसमध्ये एका बीपीओ सेंटरमधून मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेकडील सायबर सेल व संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे सेंटरमध्ये छापा टाकण्यात आला.
तिघेही हे बीपीओ सेंटर चालवत होते. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नाव वापरून त्यांनी अमेरिकन नागरिकांचा डाटा मिळविला होता.या नागरिकांना ते व्हीओआयपी कॉलची सुविधा वापरून फोन करत असत. याआधारे ते हा फोन अमेरिकेतूनच आला असल्याचे भासवत असत. फोनद्वारे ते संबंधितांना आपल्या संगणकामध्ये व्हायरस आहे, तो काढायचा आहे असे खोटे सांगायचे. त्याआधारे ते टिम व्हीवर या सॉफ्टवेअरच्याद्वारे संगणकामध्ये प्रवेश करत होते. त्यानंतर नागरिकांच्या बँकेच्या खात्याची संवेदनशील माहिती मिळवून त्याचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून डॉलरमध्ये रक्कम मिळवीत होते. पोलिस तपासात ही सर्व माहिती निष्पन्न झाली आहे. अपर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलिस उपायुक्त दिपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक, पोलिस निरीक्षक सुनिल पवार, मिलिंद गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी राजकुमार जाबा, उमेश शिंदे, किरण अब्दागिरे, नितीन चांदणे, अश्विन कुमकर, सरिता वेताळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
(प्रतिनिधी)
लाखो अमेरिकनांना फसवले...
प्रत्येक नागरिकाकडून ते सुमारे ३०० डॉलर घेत होते. त्यांनी सुमारे १० लाख अमेरिकन नागरिकांना अशा प्रकारे गंडवल्याचे समजते. या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.