हळद लागण्यापूर्वीच सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; राठोड कुटुंबावर कोसळलं आभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 08:09 PM2022-03-21T20:09:20+5:302022-03-21T20:09:33+5:30

अवघ्या आठच दिवसावर लग्न येऊन ठेपले होते. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती.

Young woman dies of snake bite before ingestion of turmeric; Rathod family was Shocked, Incident at Yavatmal | हळद लागण्यापूर्वीच सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; राठोड कुटुंबावर कोसळलं आभाळ

हळद लागण्यापूर्वीच सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; राठोड कुटुंबावर कोसळलं आभाळ

Next

अकोला बाजार : लग्नाची हळद अंगाला लागण्यापूर्वीच तरुणीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा येथे घडली. पायल उकंडा राठोड (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे.

पायल शनिवारी रात्री ७.३० वाजता घरासमोरील अंगणात एका पाहुण्या मैत्रिणीसह जेवणाचे भांडे धुत होती. इतक्यात सापाने तिच्या पायाच्या बोटाला दंश केला. कुटुंबीयांनी लगेच तिला घाटंजी येथे उपचाराकरिता नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. विशेष म्हणजे येत्या २९ मार्च रोजी पायलचा दारव्हा तालुक्यातील तपोना येथील चव्हाण कुटुंबातील युवकाशी विवाह होणार होता. अवघ्या आठच दिवसावर लग्न येऊन ठेपले होते. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. घरात जय्यत तयारी सुरू होती. पायल मनोमन भावी आयुष्याची स्वप्ने रंगवीत होती. अशातच हळद लागण्यापूर्वीच काळाने तिच्यावर झडप घातली. त्यामुळे भातुकलीच्या खेळामधील या राजा-राणीचा डाव अर्ध्यावरच मोडला. तिच्या जीवनाची कहाणी अधुरी राहिली. या हृदयद्रावक घटनेने राठोड व चव्हाण कुटुंबीयांंना जबर धक्का बसला आहे. काळीज पिळवटून टाकणारी घटना घडल्याने तिच्या अंत्यसंस्कारावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

राठोड कुटुंबावर कोसळले आभाळ

पायलचे वडील उकंडा व आई बेबीबाई यांच्या काळजाचा तुकडा गेल्याने त्यांच्या वेदनेला पारावार राहिला नाही. पायलच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. तिला आणखी एक लहान बहीण आहे. या धक्कादायक घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Web Title: Young woman dies of snake bite before ingestion of turmeric; Rathod family was Shocked, Incident at Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.