भररस्त्यात तरुणीला भोसकले
By admin | Published: May 25, 2016 02:40 AM2016-05-25T02:40:05+5:302016-05-25T02:40:05+5:30
कामावर जात असताना भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. करिश्मा माने (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी
मुंबई : कामावर जात असताना भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. करिश्मा माने (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.
चेंबूरच्या सुमननगर परिसरात ही तरुणी आई-वडील आणि दोन भावंडांसह राहत होती. दादर येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये ती नोकरी करत होती. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली.
सुमननगर येथून कुर्ला रेल्वे स्थानकात जाण्यासाठी थेट रिक्षा मिळत नसल्याने ती कुर्ल्याच्या शिवसृष्टी सोसायटी परिसरातून शेअर रिक्षा पकडत असे. मंगळवारीही नेहमीप्रमाणे ती याच परिसरातून कामावरून जाण्यासाठी निघाली. मात्र याच परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपीने पाठीमागून तिच्यावर चाकूहल्ला केला. हल्लेखोराने पाठीत चाकू खुपसून कुर्ल्याच्या दिशेने पळ काढला.
याच परिसरातून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला रिक्षात घालून येथील सुराणा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ तिच्यावर उपचार सुरू करत शस्त्रक्रियेची तयारी केली. मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालय परिसरात रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)
बराच वेळ चाकू पाठीतच
हल्लेखोराने या तरुणीच्या पाठीत चाकू खुपसून पळ काढला. त्यामुळे बराच वेळ हा चाकू तरुणीच्या पाठीतच होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा चाकू काढण्यासाठी ती डॉक्टरांकडे विनंती करत होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिची ही गंभीर अवस्था पाहून तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले.
ज्या ठिकाणी या तरुणीची हत्या झाली; त्याच ठिकाणी अनेकदा पादचाऱ्यांना लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ही हत्यादेखील लुटीच्या माध्यमातून झाली असावी असा संशय पोलिसांना होता. मात्र तरुणीच्या अंगावरील एकही दागिना गायब झाला नव्हता. शिवाय तिची पर्स आणि मोबाइलदेखील तिच्याजवळच होता. त्यामुळे ही हत्या पे्रमप्रकरणातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार नेहरू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.